अलिबाग | रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी, २ ऑगस्ट रोजी येथे केले. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंगच्या नामकरण व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माणगाव येथील पवित्र भूमीत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाची एक अद्यावत अशी नर्सिंग कॉलेजची इमारत उभी झाली आणि त्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले.
माणगाव तालुयातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षणाचे दालन उभे झाले आहे. येथे शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान कसे मिळेल ते पहावे. या नर्सिंग कॉलेजला खासदार सुनील तटकरे यांच्या आईचे नाव दिले असून त्यांच्या आईच्या नावाला साजेसे काम येथून व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. खा. सुनील तटकरे म्हणाले की, रायगड जिल्ह्यात शिक्षणाचे हब सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात प्रगती होत असून येथील होत असलेल्या औद्योगिकरणामध्ये कुशल कामगार स्थानिक पातळीवर तयार करता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. औद्योगीकरणामुळे येथील रोजगार वाढीस चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता वेगवेगळी शिक्षणाची दालने उभी केले जात आहेत. जिल्ह्यात शिक्षण व आरोग्य सुविधासाठी लागणार्या बाबींसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही खा. तटकरे यांनी सांगितले.