नवी मुंबई | नवी मुंबई महापालिकेने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत गणेशोत्सव मंडळांचे सदस्य, पोलिस, वाहतूक पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी सहभागी झाले होते.
गणेशभक्तांच्या शंकांचे निरसन बैठकीत करण्यात आले. एकूण ६३ गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव मंडळांचे सदस्य या बैठकीला हजर होते. यावेळी बोलताना आयुक्त डॉ. कैलास शिंदे म्हणाले, "प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळा. पर्यावरणपूरक सजावट करा. सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असाव्यात असे आवाहन केले. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात ध्वनी प्रदूषण टाळावे यामुळे नागरिक आणि शाळकरी मुलांना त्रास होणार नाही, असे सांगण्यात आले.
ज्या मंडळांनी मागील वर्षी परवानगी घेतली होती, त्यांची परवानगी ५ वर्षांसाठी ग्राह्य धरली जाईल. पण, या मंडळांना अग्निशमन दल, पोलिस आणि वाहतूक पोलिस विभागाकडून ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.