कर्जत उल्हास नदीच्या पुलावरुन पाणी, पोलिसांकडून वाहतूक बंद

By Raigad Times    21-Aug-2025
Total Views |
 karjat
 
कर्जत | तालुक्यात सलग तीन चार दिवस पाऊस आहे, मात्र पाऊस थांबून पडत असल्याने सर्व नद्या धोक्याच्या पातळीपुढे गेलेल्या नाहीत. दरम्यान, उल्हास नदीवरील कमी उंचीच्या दहिवली मालेगाव येथील पुलावरून पाणी जात असल्याने पोलिसांनी या पुलावरील वाहतूक बंद केली आहे.
 
रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी पाहता रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत कर्जत तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असून नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तालुक्यातून वाहणार्‍या सर्व नद्या ओव्हर फ्लो असल्यासारख्या वाहत आहेत.
 
त्याचवेळी लहान मोठे नालेदेखील प्रवाहित होऊन वाहत असल्याने धोका कायम आहे. तालुक्याच्या मध्यातून वाहणारी उल्हास नदीवरील माथेरान-नेरळ -कळंब राज्य मार्ग रस्त्यावरील दहिवली मालेगाव पूल कमी उंचीचा असल्याने सायंकाळपासून पुलावरुन पाणी जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पूल वाहतूक बंद करण्यात आला होता. मंगळवारपासून सुमारे १४ तास हा पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. नेरळ पोलिसांनी बॅरिगेट्स लावले असून पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला आहे.
 
हा पूल वाहतुकीस बंद असल्याने सुमारे ४० गावांचा संपर्क तुटला आहे. तर नेरळ-कळंब वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी, वाहनचालकांना तळवडे पूल किंवा वाकस पुलावरून पर्यायी मार्गे वाहतूक करावी लागते आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच धरणे भरली आहेत. मुसळधार पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असल्याने सर्वत्र नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत.
 
त्यातच दहिवली येथील उल्हास नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. पुणे भागातील धरणाच्या पाण्याचा विसर्ग कर्जत तालुक्यात होत असल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांचे दरवाजे खुले केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उल्हास नदी काठी असलेल्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पाण्याचा विसर्ग करु नका, असे आवाहन जलसंपदा विभागाला आवाहन करण्यात येत असून सद्यस्थितीत दुथडी भरून वाहणार्‍या नदीपात्रात पाणी सोडले तर नदीकिनारी असलेली गावे जलमय होण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन पाणी सोडण्याची वेळ जाहीर करावी अशी मागणी कर्जतकर करत आहेत.