मुंबई | गणेशोत्सवासाठी बाप्पाचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन क्षमतेपेक्षा जास्त वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपर्यंत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे.
यामध्ये अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे.५ व ७ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी ११ दिवसांचे गणपती विसर्जन, परतीचा प्रवासाकरिता ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहतूकीस बंदी राहील.
महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपासून ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत, ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपासून ते २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूकीस परवानगी राहील.
तसेच सर्व वाहनांना ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेनंतर नियमित वाहतूकीस परवानगी असेल.हे निर्बंध जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर येथून आयात- निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषधे, लिक्वीडमेडीकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्या वाहनांना लागू राहणार नाही.
तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने -आण करणार्या वाहनांनाही ही बंदी लागू राहणार नाही. कोकणात जाणार्या गणेशभक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधीत जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथील करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपले स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील, याकरिता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे, असे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
मुंबई-पुणे बोरघाट या महामार्गावरही जड-अवजड वाहनांना बंदी
अलिबाग | मुंबई-पुणे बोरघाट या महामार्गावर जड- अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग बोरघाट हा तीव्र चढउताराचा वाळणाचा रस्ता असल्याने या महामार्गावरील वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीकरिता बंद करण्याबाबत रायगड पोलीस अधीक्षक यांनी पत्रव्यवहार केला होता.