अलिबागमध्ये शेकाप-शिवसेनेतील वाद पेटला , दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात निदर्शने

दंडेलशाहीविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा-अ‍ॅड.मानसी म्हात्रे

By Raigad Times    21-Aug-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शेकापच्यावतीने बुधवारी (२० ऑगस्ट) जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी दंडेलशाहीविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकापच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष अ‍ॅड.मानसी म्हात्रे यांनी केले.
 
मंगळवारी मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे चित्रलेखा पाटील यांच्या वादग्रस्त विधानानंतर, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मानसी दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. या पार्श्वभूमीवर शेकापने अलिबागमध्ये बुधवारी सभा घेऊन, नंतर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड.मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस अ‍ॅड.गौतम पाटील, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, अलिबाग तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, शेकाप शहर महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. निलम हजारे, सोनाली कासार, सतिश प्रधान, अशोक प्रधान, अनिल चोपडा, संजना किर, अनिल गोमा पाटील, विक्रांत वार्डे, आदींसह वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबाग, मुरूड, रोहा मतदार संघाची काय परिस्थिती आहे.
 
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलांची अवस्था बिकट झाली आहे. विद्यार्थी, महिला, कामगारांना चिखल, खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे एसटी फेर्‍या बंद आहेत. प्रवासी त्रस्त झाले आहेत. स्मार्ट मीटरच्या नावाखाली तिप्पट वीज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मतदार संघात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे आणि दादागिरी रेटून करायची ही विरोधकांची भूमिका आहे.
 
आता हे खपवून घेणार नाही. सोशल मीडियाचा आधार घेत वेगवेगळे व्हिडीओ टाकले जात आहेत. दंडेलशाहीविरोधात तुकडी तयार केली पाहिजे, असे आवाहन अ‍ॅड.मानसी म्हात्रे यांनी केले. विरोधक काही चुकीचे करीत असेल तर रोखणे, सडेतोड उत्तर देणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी शेकाप कार्यकर्त्यांनी मानसी दळवीसह अन्य जणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. या निषेध मोर्चात काळे झेंडे घेवून शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

alibag
 
चित्रलेखा पाटील यांचे अत्यंत बालिश वर्तन-मानसी दळवी
अलिबाग | मिठेखार येथे घडलेल्या घटनेविरोधात शेकापने निषेध मोर्चा काढल्यानंतर शिवसेनेनेही याला मोर्चातूनच उत्तर दिले आहे. शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्या वर्तनाचा निषेध केला. चित्रलेखा पाटील यांचे वर्तन अत्यंत बालिश असून ते माणुसकी दर्शविणारे नसल्याची टिका यावेळी करण्यात आली. खानाव येथे बुधवारी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
या बैठकीनंतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेकाप आणि चित्रलेखा पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या छायाचित्राला जोडेदेखील मारण्यात आले. यावेळी बोलताना, शिवसेना नेत्या मानसी दळवी यांनी चित्रलेखा पाटील यांना पुन्हा एकदा सुनावले आहे.
 
प्रसंग काय आणि तुम्ही बोलता काय? दुर्दैवी घटनेनंतर, गेलेल्या माणसाच्या कुटुंबाच्या, ग्रामस्थांच्या मागे उभे राहणे आवश्यक असते; मात्र ज्यांची बुध्दीच बालिश आहे, त्यांना सांगणार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे ज्यांना राजकारण करण्याशिवाय सध्या कामच नाही, अशांना लोक स्वीकारत नाहीत, असा टोलाही मानसी दळवी यांनी लगावला आहे. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख संजीवनी नाईक यांनीही शेकापला सुनावले.
 
प्रशासनाच्या चुका लक्षात आणून देण्यात गैर नाही; मात्र वेळ, काळ पाहून बोलण्याचे भान शेकाप नेत्यांनी ठेवावे. नको तिथे राजकारण केल्यावर मग अंगाशी येते, असे त्या म्हणाल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी, नेते दिलीप भोईर, तालुकाप्रमुख अनंत गोंधळी, शैलेश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.