कोलेटीनजीक एसटी-टेम्पोची धडक , टेम्पोचालक गंभीर; एसटीतील ११ प्रवासी किरकोळ जखमी

By Raigad Times    02-Aug-2025
Total Views |
 alibag
 
नागोठणे | मुंबई गोवा महामार्गावर कोलेटी गावाजवळ एसटी बसने समोरुन येणार्‍या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो चालक दिनेश कुमार यादव हा गंभीर जखमी झाला असून, एसटीतील ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
 
नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे आगाराची शिवथरघळ-महाड-पनवेल-ठाणे ही एसटी घेऊन चालक दिनकर गोविंद डोंगरे (वय ३६) हा महाडकडून पनवेलच्या दिशेने निघाला होता. नागोठणेजवळील कोलेटी गावानजीक त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि तो वडखळकडून महाडकडे जाणार्‍या टेम्पोला चालक बाजूस जाऊन धडकला. या धडकेने टेम्पोचा चालक बाजूचा भाग आतमध्ये चेपला गेल्याने चालक दिनेश कुमार यादव (वय ४८) याचा पाय टेम्पोखालील भागात अडकला होता.
 
स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान ओळखून लोखंडी साखळीच्या सहाय्याने टेम्पोचा आत चेपलेला भाग एसटी बसच्या मदतीने मागे ओढून टेम्पो चालकास बाहेर काढले. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन त्याला अधिक उपचारार्थ अलिबाग येथे दाखल करण्यात आले.या अपघातात एसटी बसमधील मुजमील मोहम्मद अली येलुकर, सोनू भागुजी शिंदे, निर्मिती निलेश कडू, महंमद अली इब्राहिम येलूकर, आर्या चालके, रोहिणी अरुण भोनकर, सोनाली सोनू शिंदे, अनघा अनिल सावंत, सायली सुनील कोंडालकर, संतोष सखाराम शिंदे, मुकुंद संजय कदम हे ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
 
या सर्व जखमींना स्थानिकांच्या सहकार्याने पोलिसांनी प्राथमिक उपचारार्थ नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच नागोठणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस, महामार्ग वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गितांजली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केले होते. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून महिला पोलीस हवालदार एम.जे. शेरमकर अधिक तपास करीत आहेत.
मंत्री भरत गोगावले यांच्याकडून जखमींची विचारपूस
या अपघातात माणगाव व महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक जखमी झाले असल्याचे राज्याचे रोहयो मंत्री भरत गोगावले यांना समजताच त्यांनी तात्काळ नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन त्याठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या जखमींची भेट घेऊन त्यांची सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली. यावेळी रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे हेदेखील आरोग्य केंद्रात उपस्थित होते.