अलिबाग | रायगड जिल्ह्यामध्ये आजचा दिवस राजकीय घडामोडींचा ठरणार आहे. शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त मोठा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादीचे दोन पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होणार आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांची बैठक महाड येथे होणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे आदी नेते आज रायगडात आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन शनिवारी (२ ऑगस्ट) नवीन पनवेलमधील पोलीस मैदान येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खा. संजय राऊत, आणि शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पक्षफुटीनंतर शेकापचा हा पहिला वर्धापन दिन आहे.
त्यामुळे शेकापच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील रायगडात आहेत. माणगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी अॅड.राजीव साबळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. साबळे हे माणगाव परिसरातील मोठे नेते आहेत. तर सायंकाळी चार वाजता काँगे्रसचे नेते अॅड. प्रविण ठाकूर हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
अॅड. प्रविण ठाकरे हे अलिबागचे माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव आहेत. त्यांनीदेखील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. राजीव साबळे आणि प्रविण ठाकूर या दोन नेत्यांसोबतच आणखी कोण कोण प्रवेश करणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी मेळावा महाड येथे आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे नेते, मंत्री भरत गोगावले, किरण पावसकर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील सेनेचे आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यात आघाडीवर असून, नवनवीन पक्षप्रवेश घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे.