कोलाड | कोलाड परिसरातील कुंडलिका नदीच्या पुलावर सतत पडत असलेल्या पावसामुळे जीवघेणे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे या मार्गांवरून प्रवास करणार्या विद्यार्थ्यांसहित वाहनचालक तसेच प्रवासी नागरिक यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पुलाच्या बाजूने जाणारा पादचारी पूल धोकादायक आहे.
याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासीवर्गातून व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गांवरील कोलाड परिसरातील कुंडलिका नदीवरील पुलाचे काम चार पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. परंतु पुलावर केलेले डांबरीकरणाचे काम एवढे निकृष्ट दर्जाचे आहे की पाऊस पडला की दरवर्षी या पुलावर तलावाचे स्वरूप प्राप्त होते. पडलेले पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा नाही कारण रस्ता खाली, पाणी जाण्यासाठी लावलेले पाईप वर, यामुळे पावसाचे पाणी साचून राहत आहे.
यामुळे या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून यातून मार्ग काढतांना वाहन चालकांची तारांबळ उडत असून यामुळे या मार्गांवरून प्रवास करणार्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गोवे येथे गीता द. तटकरे पॉलिटेनिकल कॉलेज असून या मार्गांवरून असंख्य विद्यार्थी ये-जा करीत असतात. तर असंख्य गावातील धाटाव एमआयडीसीत कामावर जाणारे कामगार, कोलाड बाजारपेठेत जाणारे नागरिक व कोलाड हायस्कूलकडे जाणारे असंख्य विद्यार्थी याच मार्गानी ये-जा करीत असतात.
परंतु कुंडलिका पुलावर साचलेले पाणी मोठ्या वाहनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरी परत जावे लागत आहे, याला जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला १८ वर्षे पूर्ण झाली.
किती ठेकेदार आले किती गेले तरी या महामार्गाचे काम काय पूर्ण होईना? काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. परंतु तेही निकृष्ट दर्जाचे, याला मुख्य कारण शासनाचे ठेकेदारावर नसलेला वचक. परंतु यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कुंडलिका नदीवरील पुलावरील पाणी निघण्यासाठी हा रस्ता पाणी निघण्यासाठी ठेवलेल्या पाईपा बरोबर केला पाहिजे. तसेच पाणी निघणारे पाईप साफ केले पाहिजे. तरच हा प्रश्न मार्गी लागेल असे प्रवासीवर्गातून बोलले जात आहे.