करंजा बंदरात बोट हायजॅक!

By Raigad Times    02-Aug-2025
Total Views |
 uran
 
उरण | करंजा बंदरात अतिरेकी आले असून त्यांनी प्रवासी बोट हायजॅक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली होती. मात्र बर्‍याच वेळानंतर हे ‘मॉकड्रील’ असल्याचे समजले आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
 
शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजता उरण पोलीस ठाण्यात दूरध्वनी खणखणला. यावेळी करंजा बंदरात अलिबागच्या दिशेने दोन बंदूकधारी दहशतवादी येत असून त्यांनी प्रवासी बोट हायजॅक करून प्रवाशांना ओलीस धरल्याची माहिती मिळाली. या सूचनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि तातडीने करंजा बंदराच्या दिशेने रवाना झाली.
 
पोलिसांनी करंजा-रेवस जलसेवा असलेल्या प्रवासी बोटीला घेराव घालत बोटीवरील दहा प्रवासी यांच्यासह दोन दहशतवादी यांच्याशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार करण्यात आला तर एकाला जीवंत पकडण्यात आले आहे. तपासणीत त्यांच्याकडून ‘आरडीएक्स’ही ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी नवी मुंबईतील क्यूआरटी, एटीएस पथकाला दिली आणि ही पथके घटनास्थळी दाखल झाली.
 
क्यूआरटी पथकाने संशयित अतिरेक्यांची तपासणी आणि चौकशी केली असता हे मॉकड्रील असल्याचे आढळून आले होते. यावेळी, सागरी सुरक्षा दलाच्या पथकासमवेत अग्निशमन दल, रुग्णवाहिकासुद्धा हजर झाली होती. या कारवाईदरम्यान उरण तालुक्यातील पोलीस अधिकार्‍यांसह शंभरहून अधिक कर्मचारी उपस्थित होते. हे मॉकड्रील तब्बल दोन तास सुरू होते. या मॉकड्रीलमध्ये उरण, मोरा सागरी, न्हावा शेवा येथील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली.