काशिद किनार्‍यावर सापडली चरसने भरलेली गोण ! ५५ लाखांचा ११ किलो चरस जप्त; अज्ञातावर गुन्हा दाखल

By Raigad Times    02-Aug-2025
Total Views |
 Murud
 
मुरुड-जंजिरा | मुरुडच्या काशिद समुद्रकिनार्‍यावर चरसने भरलेली गोणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल ११ किलो १४८ ग्रॅम चरसचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ५५ लाख ७४ हजार आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसराची तपासणी करत, किनार्‍यावर आणखी कुठे किंवा पाकीटे सापडतात का? याचा शोध घेतला.
 
त्यामुळे काहीकाळ या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. काशिद समुद्रकिनारी संशयास्पद प्लास्टिक गोणी दिसत असल्याची खबर गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे हे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस हवालदार जनार्दन गदमले, हरी मेंगाळ, पोलीस शिपाई मकरंद पाटील, निखिल सुर्ते, कैलास निमसे, संतोष मराडे, सुमित उकार्डे या सहकार्‍यांसह तातडीने दाखल झाले.
 
काशिद समुद्रकिनार्‍यावर सापडलेल्या संशयास्पद प्लास्टिक गोणीची तपासणी केली असता,सदर गोणीमध्ये चरस सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. समुद्रकिनारावर व परिसरात कुठे आणखी गोणी किंवा पाकीटे मिळतात का? याची खात्री करण्यासाठी संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. यामुळे समुद्र किनार्‍याला काही काळ छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सापडलेल्या गोणीमधील ५५ लाख ७४ हजार रुपये किंममतीचा ११ किलो १४८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी अज्ञाताविरोधात मुरुड पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब)(क), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीक्षा खेतमाळीस यांनी घटनास्थळी पोहोचून सदर माहिती घेऊन मिळालेला चरस सदृश्य अंमली पदार्थ जप्त करुन सीलबंद केला.