मतांच्या लोणीसाठी नेत्यांकडून धुडगूस!

By Raigad Times    18-Aug-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | दहीहंडी, श्रीकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करून देणारा आणि एकता व सामूहिकतेचा संदेश देणारा एक महत्त्वाचा सण. परवा शनिवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. एकेकाळी हा सण केवळ मानवी मनोर्‍यांसाठी नव्हे, तर त्यातील भक्ती, गोपाळांचा खोडकरपणा आणि सामूहिक उत्साहासाठी ओळखला जात होता.
 
यामागे शेजारधर्माने, आपुलकीच्या भावनेने साजरी होणारी परंपरा होती. लोण्याच्या हंडीतून उमटणारा आनंदच तिचा खरा गाभा होता. मात्र, अलिकडच्या काळात या उत्सवाचे स्वरुप बदलले असून, खास करुन मोठ्या शहरांमध्ये तो धार्मिक श्रद्धेपेक्षा राजकीय शक्तीप्रदर्शनाचा आणि व्यावसायिक स्पर्धेचा एक भाग बनला आहे. मोठ्या बक्षिसांची घोषणा, डीजेचा दणदणाट, सेलिब्रिटींचा सहभाग यामुळे या सणाचे पावित्र्य तर नष्ट झाले आहेच, पण सोबतच गोविंदांच्या जीवावरही बेतत आहे.
 
या पार्श्वभूमीवर, आजचा हा उत्सव खर्‍या अर्थाने श्रीकृष्णाच्या दहीहंडीचे प्रतीक राहिला आहे का, की राजकारण्यांच्या मतपेटीचे लोणी ओरपण्याचा एक सोयीस्कर मार्ग बनला आहे, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.परवाच्या दहीहंडीने पुन्हा एकदा हेच सिद्ध केले की, या उत्सवाने आपले मूळ स्वरूप गमावले आहे. एकेकाळी गल्ली-गल्लीत आपुलकीने साजरा होणारा हा सण आता राजकारण्यांच्या शक्तीप्रदर्शनाचे एक साधन बनला आहे.
 
alibag
 
मोठ्या मंडपांची सजावट, डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज, लाखो रुपयांची बक्षिसे आणि सेलिब्रिटींचा वावर, या सगळ्यामध्ये संस्कृतीचा आत्मा हरवून गेला आहे. लोकांच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन मतांचे पीक काढण्याचा हा सोपा मार्ग राजकारण्यांनी शोधला आहे. या उत्सवाच्या नावाखाली चाललेला उन्माद भयावह होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने गोविंदा असलेल्या परिसराची शांतता भंग पावली. भक्तीच्या नावाखाली चाललेल्या या धुडगुसात महिलांना नाचवले गेले आणि गर्दीतील विकृती उफाळून आली.
 
ज्या हंडीत दूध-दही-लोणी असायला हवे, त्याऐवजी लाखो रुपयांचा मलिदा आधुनिक गोविंदांनी लुटला. या सगळ्यामुळे, सणाचे पावित्र्य तर नष्ट होताना दिसत आहे. दहीहंडी उत्सवी परंपरा राहिली नसून तो एक धाडसी खेळ बनला आहे, यात शंका नाही. पण तो आता धोकादायक बनला आहे. कमी वयाच्या मुलांना उंच मनोरे चढायला लावले जाते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
 
प्रत्येक वर्षी अनेक गोविंदा गंभीर जखमी होतात किंवा आपला जीव गमावतात. राजकारणी केवळ आपल्या नावाचा बोलबाला व्हावा यासाठी गोविंदांच्या जीवाशी खेळतात. त्यांच्या सुरक्षेची त्यांना पर्वा नाही. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार यंदा फक्त एका दिवसात ३१८ हून अधिक गोविंदे जखमी झाले, त्यातले अनेक गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात १५ पेक्षा जास्त गोविंदांचा मृत्यू झाला आहे.
 
तरीही आयोजक त्याच चुकांची पुनरावृत्ती करतात. राजकीय आयोजकांनी क्रीडा प्रकार म्हणून कबड्डी, क्रिकेट, बैलगाडा शर्यत याप्रमाणे दहीहंडीच्या वर्षभर स्पर्धा बिनधास्त आयोजित कराव्या. पण त्यांनी गोपालकाल्याच्या दिवसाचे पावित्र्य नष्ट करु नये. लोकांच्या झोपेचे खोबरं करण्यासाठी रात्री दोन-तीन वाजेपर्यंत रस्त्यांवर त्यांचे आयोजन करु नये, मैदानात आयोजन करावे. आजची दहीहंडी आणि श्रीकृष्णाचा गोपालकाला यात जमीन असमानाचे अंतर आहे. राजकारण्यांना गोविंदांचा जीव किती महत्त्वाचा? शून्य! त्यांना फक्त त्यांच्या पोस्टरवरचा फोटो, मंचावरचा माईक, आणि टाळ्यांचा गडगडाट हवा असतो.
 
गोविंदांचा घाम, रक्त आणि कधी कधी प्राण गमावण्याची किंमत त्यांच्यासाठी काहीच नाही. विम्याची घोषणा केली जाते, पण बक्षिसं वितरित झाली की सगळं विसरलं जातं. राजकारण्यांनी या सणापासून दूर राहून, त्याला त्याच्या मूळ स्वरूपात परत आणणे आवश्यक आहे. त्यांनी या दिवसाचे पावित्र्य राखले पाहिजे. दहीहंडीचा उत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या मूळ धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांना जपून साजरा व्हायला हवा.
 
केवळ अशाप्रकारेच आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण करू शकतो, अन्यथा ही दहीहंडी केवळ मतांचे लोणी लुटण्याचे एक माध्यम बनून राहील. दहीहंडीचा उत्सव हा केवळ एक खेळ नाही, तर आपल्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि सामूहिकतेचा एक अमूल्य वारसा आहे. तो जर राजकीय मंचावरचा तमाशा बनला, तर आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण करू शकणार नाही. श्रीकृष्णाच्या गोपालकाळ्याचे प्रतीक म्हणून दहीहंडी साजरी करायची असेल, तर ती शांततेत, सुरक्षिततेत आणि श्रद्धेने साजरी व्हायला हवी; अन्यथा ही दहीहंडी केवळ मतांचे लोणी लुटण्याचे एक माध्यम बनून राहील.