महाड | महाड शहरासह तालुक्यात दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यावर्षी महाड शहरात शिवसेना पुरस्कृत श्री भरतशेठ गोगावले मित्रमंडळाच्या दही हंडी उत्सवा सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनेही दही हंडी उत्सवाचे आयोजन केल्याने गोविंदा पथकांसाठी पर्वणीच ठरली.
याखेरीज श्री शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाच्या वतीनेही दही हंडी उत्सवाचे सालाबाद प्रमाणे आयोजन केले होते. शहरातील प्रत्येक आळीत व तालुक्यातील गावागावामध्ये सार्वजनिक व खासगी दहिहंड्या खालुबाजाच्या तालावर नाचत फोडण्यात आल्या.
महाड शहरात शिवसेनेच्या वतीने श्री भरतशेठ गोगावले मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला महाड, पोलादपूर, माणगांव तालुक्यासह खेड रोहा तालुक्यातील गोविंदा पथकांनीही हजेरी लावून आनंद लुटला.
श्री भरतशेठ गोगावले मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात माणगांव येथील ज्ञानदेव पवार मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने ८ थर लावून १ लाखाचे रोख पारितोषिक व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते स्विकारले. याच बरोबर ७ थराला २५ हजाराचे पारितोषिक देण्यात आले. यामध्ये खेड, बिरवाडी, काळीज, महाड नवेनगर, तळेगांव, लोणेरे, वरसगांव रोहा येथील पथकाने ७ थरांची सलामी देत मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व ट्रॉफी स्विकारली.
राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभुमी विकास मंत्री ना. भरतशेठ गोगावले, माजी जिप सदस्या सुषमाताई गोगावले, भाजपचे उपजिल्हा प्रमुख बिपीन म्हामुणकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडीक, संपर्क प्रमुख विजय सावंत, शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, सिध्देश पाटेकर, राजु पावले, प्रवक्ते नितीन पावले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आयोजित दहीहंडी उत्सवातील ५० फुटावरील हंडी फोडण्यासाठी १ लाख ५५ हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या उत्सवात महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील गोविंदा पथकांनी हजेरी लावून पाच,सहा, सात थरांची सलामी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप, तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, शहर अध्यक्ष राकेश शहा, श्रीयश जगताप, माजी नगराध्यक्ष सुरेश शिलीमकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गोविंदा पथकांना आकर्षक रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित दहीहंडी उत्सवात पुणे येथील रिदम मेलडी आर्केस्ट्रा करमणुकी साठी आयोजित केला होता.