रोहा | रोहयात पारंपारिक पध्दतीने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. रोहयात सततधार पाऊस सुरू होता, या पावसाने गोविंदा पथकांमध्ये जान आणली, हा पारंपारिक सण अतिशय आनंदात साजरा झाला. शहरातील तिन्ही प्रमुख आळयांमधुन गोविंदा निघतो, दुपारनंतर एकामागुन एक असे ठरलेल्या क्रमाने हे गोविंदा रोहा बाजारपेठेत आले, येथिल उंच दही हंडया फोडण्यात आल्या.
हे क्षण पाहण्यासाठी नागरिकांनी बाजार पेठेत मोठी गर्दी केलेली होती, शुक्रवारी साजरी झालेल्या आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी स्पर्धेला अलोट गर्दी झालेली, या स्पर्धेने रोहा शहर गजबजून गेले होते.रोहा तालुक्यात जवळपास १२४ दहिहंडयांचे आयोजन करण्यात आलेले. त्यामध्ये रोहा शहरात शुक्रवारी झालेली रोहा तालुका शिवसेना आणि आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानची दहीहंडी स्पर्धा, शनिवारी सायंकाळी होत असलेली माजी आमदार अनिकेत तटकरे मित्रमंडळाची दहीहंडी स्पर्धा, राममारुती चौकातील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांची दहीहंडी आणि भाजपाचे रोशन चाफेकर यांच्या माध्यमातून तीनबत्ती नाका येथे आयोजित केलेली दहीहंडी या रोहयाच्या गोविदोत्सवाचे आकर्षण होत्या.
शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे आयोजित स्पर्धेत 8 थरांची सलामी रोठ खुर्द गावाने दिली. लोकांनी हा थरारक दृश्य पाहून आनंद, जल्लोष व्यक्त केला, ग्रामीण भागासह रोहा अष्टमी शहरातील विविध आळयांमधुन गोविंदोत्सव साजरा केला गेला.
दुपार नंतर गावातील प्रथे परंपरे प्रमाणे साईनाथ मित्र मंडळ मोरे आळी, त्यानंतर जय गिरोबा अंधार आळी व रोहयाचा राजा धनगर आळी हि गोविंदा पथके त्यात्या आळीतील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबध्दतेने एकामागुन एक असे बाजारपेठेत आल्या. येताना वाटेत विविध ठिकाणी बांधलेल्या दहीहंडया फोडुन या उत्सवाचा आनंद गोविंदांनी लुटला.
गौरोबा नगर दमखाडी येथिल गोविंदा पथक आणि महात्मा फुले नगर, धाविर रोड येथिल संत रोहिदास गोविंदा पथक यांनी मुख्य हमरस्त्यावरील तीन बत्ती नाका पोलिस चौकी पर्यंत येत यादरम्यान बांधण्यात आलेल्या दहीहंडया फोडुन गोविंदोत्सव साजरा केला. पावसाने गोविंदा पथकांचा उत्साहा वाढिस लागलेला. तीन बत्ती नाका येथुन पुढे नदीकडे जात हे गोविंदा पथके विसर्जित करण्यात आली. रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.