पनवेल | गोपाळकाला निमित्त गोविंद पथकाकडून थरावर थर लावत मानवी मनोरा तयार करण्यात आला. हा सहासी खेळ सर्वत्र लोकप्रिय आहे. त्याशिवाय दहीहंडी उत्सव अपुरा आहे. दरम्यान थरांचा थरार लावला जात असताना त्याला कामोठे येथे शनिवारी शिवकालीन युद्ध कलेची एक प्रकारे सलामी देण्यात आली. शितल दिनकर, जयश्री झा सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ पथकाने लाठीकाठी , तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचे प्रत्यक्षिके सादर केले.
या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे स्त्रियांना देण्यात आले. संघर्ष प्रतिष्ठान व मराठी कामगार सेनेच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी गोपाळकाला साजरा करण्यात आला . या निमित्ताने दहीहंडी उत्सवाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. पनवेल परिसरातही मोठ्या उंचीच्या दहीहंड्या गेल्या काही वर्षांपासून आयोजित केल्या जातात.
पनवेल मध्ये दहीहंडी उत्सवाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विविध सामाजिक संस्था त्याचबरोबर राजकीय पक्षांकडून लाखो रुपये किमतीच्या हंड्या लावण्यात आल्या होत्या. मुंबई शहर आणि उपनगरातूनही गोविंदा पथकांनी यंदा सुद्धा पनवेल परिसरात हजेरी लावली. दरम्यान कामोठे वसाहतीमध्ये सर्वाधिक दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या. सेक्टर 9 येथील चौकात संघर्ष प्रतिष्ठान व मराठी काम गार सेनेच्या वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता.
कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उत्सवात विविध गोविंदा पथकांना निमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी थरांचा थरार अनुभवता असताना. जिजाऊ पथकाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे. त्या स्वयंसिद्ध व्हाव्यात या उद्देशाने शिवकालीन युद्ध कला असणाऱ्या लाठीकाठी आणि तलवारबाजी आणि दांडपट्टा प्रात्यक्षिके या निमित्ताने दाखवण्यात आले.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक वेगळा संदेश देण्याची संकल्पना आयोजक आणि जिजाऊ पथकाने यशस्वी करून दाखवली. शितल दिनकर आणि जयश्री झा यांच्या मार्गदर्शनाखाली या युद्ध कलेच्या सरावाला काही दिवसांपासूनच सुरू होता. शालेय विद्यार्थिनींना यामध्ये प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या युद्ध कलेची झलक दहीहंडी उत्सवानिमित्त दाखवून दिली.