तरुणांनो, तयारीला लागा... महाराष्ट्र पोलीस दलात महाभरती!

१५ हजार जागा भरणार | वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी

By Raigad Times    13-Aug-2025
Total Views |
mumbai
 
मुंबई | महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी या वर्षीपासून ओएमआर प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
 
तसेच २०२२- २३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली आणि २०२५ मध्ये रिक्त होणार्‍या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहेत. पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून लवकरच याबाबतची जाहिरात प्रकाशित होण्याची शक्यता आहे.
ओएमआर आधारित लेखी परीक्षा
पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण आणि खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत.
 
पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी तयार राहा
पोलीस भरतीची स्वप्ने पाहणार्‍या इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच सज्ज व्हायला हवे. शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत, या तिन्ही टप्प्यांसाठी सखोल तयारी करणे गरजेचे आहे. भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया नीट तपासावी. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे.
भरण्यात येणारी पद संख्या
*पोलीस शिपाई १० हजार ९०८
*पोलीस शिपाई चालक २३४
*बॅण्डस् मॅन २५
*सशस्त्री पोलीस शिपाई २,३९३
*कारागृह शिपाई ५५४