अलिबाग | अलिबागमधील मानाची व प्रतिष्ठेची मानल्या जाणार्या प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित शेकाप पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत दहीहंडीउत्सवाची जोरदार तयारी सुरु असून, मंगळवारी (१२ ऑगस्ट) महिला व पुरुष गोविंदा पथकाच्या चषकांचे अनावरण करण्यात आले. शेकाप भवनातील सभागृहात हा अनावरण सोहळा पार पडला.
माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड.मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस अॅड.गौतम पाटील, सतीश प्रधान, शेकाप शहर चिटणीस अनिल चोपडा, संदीप शिवलकर, नील नाईक आदी मान्यवरांसह गोविंदा पथकांचे प्रतिनिधी, मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. शनिवारी (१६ ऑगस्ट) अलिबाग शहरातील शेकाप भवनसमोर दुपारी तीन वाजल्यापासून हा उत्सव रंगणार आहे.
शंभरहून अधिक सदस्यांचा यामध्ये सहभाग राहणार आहे. गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी डॉक्टरांसह, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके तैनात असणार आहेत. सर्वांना उत्सव आनंदमय व शांततामय वातावरणात पाहता यावा, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, घरबसल्या या उत्सवाचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. दहीहंडी उत्सवात सहभाग घेणार्या गोविंदा पथकांना अटी व शर्तींची माहिती यावेळी देण्यात आली.
नेमण्यात आलेल्या समितीची माहिती देऊन योग्य ती जबाबदारी खंबीरपणे पार पाडण्याची सूचना केली. या दहीहंडी स्पर्धेसाठी ५३ गोविंदा पथकांनी नोंदणी केली आहे. त्यात महिला गोविंदा पथके २५ आणि पुरुष गोविंदा पथके २८ आहेत. दहीहंडी फोडणार्या पुरुषांच्या अंतिम विजेत्या पथकाला प्रथम क्रमांकाचे १ लाख ३१ हजार १११ रुपयांचे बक्षिस व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये, सहा थरांच्या सलामीला अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे.
अंतिम विजेत्या महिला गोविंदा पथकाला प्रथम क्रमांकाचे ५१ हजार १११ रुपये व चषक असे बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणार्या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणार्या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त रिल्स स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी ३३ जणांनी नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.
स्व. नमिता नाईक यांच्या स्मरणार्थ यावर्षी विशेष पारितोषिकांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग नगरपरिषद हद्दीतील पुरुष गोविंदा पथकाने दहीहंडी फोडल्यास त्या पथकाला एक लाख रुपये आणि महिला गोविंदा पथकाला ५० हजार रुपयांचे अतिरिक्त पारितोषिक देण्यात येणार आहे.