कळंबोली | सिडको महामंडळाचे कार्यरत असणार्या हजारो कर्मचार्यांच्या संघटनेची निवडणूक होऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. अध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या अध्यक्षांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने सिडको प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे.
त्यामुळे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पद हे रिक्त आहे. अद्यापपर्यंत प्रशासकीय स्तरावर सिडको कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष कोण? हे मात्र जाहीर झालेले नाही. त्यामुळे कर्मचार्यांच्या संघटनेच्या माध्यमातून होणार्या विविध हक्क व कामे प्रलंबित राहिले आहेत. याकरता कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष लवकरात लवकर घोषित करावा, अशी मागणी निवडणुकीमध्ये द्वितीय क्रमांकाची मते मिळविलेल्या रमेश सदानंद मोकल यांनी शासनाकडे व सिडकोकडे केली आहे.
आधीच्या अध्यक्षांनी सिडको एम्प्लॉइज युनियनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. यापूर्वीच्या अध्यक्षाने केलेल्या कारनाम्यामुळे व त्या अध्यक्षावर झालेल्या लाचलुचपत कारवाईमुळे, सिडको कर्मचारी संघटनेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे सिडको व्यवस्थापन सध्या कर्मचार्यांचे प्रश्न किंवा कामे सोडविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशी कठीण परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे.
त्यामुळे सिडको कर्मचारी संघटनेची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करावी, अध्यक्ष पदाची निवडणूक त्वरीत घेण्यात यावी अथवा व्दितीय क्रमांकाची २३० मते मिळालेल्या उमेदराला सिडको कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र रमेश मोकल यांनी केली आहे.