अलिबाग | करारनाम्यातील चुकांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आणि करारनाम्यामधील चुकीच्या अटीशर्तीम ुळे पुणे-मुंबई महामार्गातून राज्य शासनाला कोणताही आर्थिक फायदा झाला नाही, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूर्वतयारी अचूक केली, तर प्रकल्प वेळेत आणि विनाअडथळा मार्गी लागू शकतात, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेच्या (मित्र) वतीने पुणे येथे आयोजित पायाभूत सुविधा विकास प्रकल्पासंदर्भात आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यावेळी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोलेटी ते कोलाड पुढे इंदापूर यादरम्यान अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. गेल्या १७ वर्षांपासून या महत्वपूर्ण महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे, मात्र आजतागायत ते पूर्ण झालेले नाही.
नियोजनशून्य काम, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, पहिल्या टप्प्यातील रखडलेले उड्डाण पूल व सेवा रस्त्यांची दुरवस्था यामुळे प्रवासी, वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले हे चौपदरीकरणाचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. परिणामी, या महामार्गावर कासूपासून पुढे आमटेम, नागोठणे, वाकण नाका तसेच कोलाडपासून पुढे तळवली तिसेदरम्यान मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात वाहने अडकून बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक जनतेने वेळोवेळी आंदोलने करुन याकडे लक्ष वेधले आहे. मात्र कामाच्या गतीत फारसा फरक पडताना दिसत नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे काम करण्यासाठी अनेक ठेकेदार झाले. आतापर्यंत शेकडो कोटींचा चुराडा झाला आहे. दरवर्षी नवनवीन आकडेवारी समोर येत असली तरी मात्र कोटींच्या कोटी खर्च करुनही काम अपूर्ण अवस्थेत आहे. या अपूर्ण कामांचा फटका सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना बसत आहे.
अपघात वाढले आहेत, निरपराधांचे नाहक बळी जात आहेत, मात्र याचे सोयरेसुतक ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आहे, ना सार्वजनिक बांधकाम विभागाला, ना कोकणातील लोकप्रतिनिधींना. त्यामुळे यंदाही कोकणात जाणार्या चाकरमानी, गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच होणार, हे निश्चित आहे. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पासंदर्भात आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत बोलले.
करारनाम्यातील चुकांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याचे ते म्हणाले. निविदा प्रक्रिया आणि त्यानंतर ठेकेदार कंपनीबरोबरच जे करारनामे केले जातात, ते चुकीचे केले जातात. राजकीय व्यक्ती अथवा अन्य कोणीही दबाव आणून निविदेतील अटी-शर्ती हव्या तशा बदलतात. त्यातून अनेक अडचणी येऊन प्रकल्पाचा खर्च वाढतो, भरपाई मोठ्या प्रमाणावर द्यावी लागते. प्रकल्पही वेळेत पूर्ण होत नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देशात २०१९ मध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रात जेवढे प्रकल्प सुरु होते, त्यापैकी महाराष्ट्रात ४९ टक्के प्रकल्पांचे काम सुरु होते. मात्र यापैकी जवळपास ४० टक्के प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लीडरशिप आणि ओनरशिप घेण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. पूर्वतयारी अचूक केली, तर प्रकल्प वेळेत आणि विनाअडथळा मार्गी लागू शकतात. त्यासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. मुंबई-दिल्ली हा महामार्ग हे अचूक नियोजनाचे उदाहरण असल्याचेही फडणवीस म्हणाले.