अलिबागेत स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिलांविरोधात शेकापचा हल्लाबोल

By Raigad Times    01-Aug-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगडसह अलिबाग परिसरात कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल भरमसाठ येऊ लागले आहेत. याविरोधात शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अलिबागमधील चेंढरे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. मीटर बसविणे बंद करा, भरमसाठ आलेले बिल रद्द करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 
शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन ते चेंढरे येथील महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ‘बंद करा, बंद करा स्मार्ट मीटर सक्ती बंद करा’ अशा घोषणा देत हा मोर्चा चेंढरे येथील महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांच्या कार्यालयात धडकला. सक्तीने बसवत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत शेकापच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारला.
 
जोपर्यंत लेखी उत्तर देत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा अ‍ॅड.मानसी म्हात्रे यांनी दिला. अखेर आठ दिवसांत सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन महावितरण विभागाचे अधिकार्‍यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सक्तीचे स्मार्ट मीटर न लावणे, लावलेले मीटर काढणे, वाढीव बिले रद्द करण्याबाबतची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ कार्यालय अलिबाग विभाग यांच्याकडे निवेदन पाठवित असून येत्या आठ दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांनी दिले.
 
यावेळी शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, अनिल पाटील, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, सतिश प्रधान, निखील पाटील, अनिल चोपडा, अ‍ॅड.निलम हजारे, नागेश कुलकर्णी, सुरेश पाटील, अशोक प्रधान, नागेश्वरी हेमाडे, प्रमोद घासे असे असंख्य विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.