आजपासून महसूल सप्ताह | सरकारी कामे मार्गी लावण्याचा आठवडा

By Raigad Times    01-Aug-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | महसूल विभागाच्यावतीने राज्यात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा सप्ताह शुक्रवार (१ ऑगस्ट) ते गुरुवार (७ ऑगस्ट) दरम्यान असणार आहे. या सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
 
१ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या आणि निवृत्त महसूल अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार होईल. २ ऑगस्ट रोजी अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कारवाई होणार आहे. ३१ डिसेंबर २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणार्‍या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत. ३ ऑगस्ट रोजी पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाणंद आणि शिवपांदण रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन अपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
 
४ ऑगस्ट रोजी महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन होऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. आधार कार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, अधिवास, जात, उत्पन्न आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप होईल. वर्षातून चार वेळा अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डिबिटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तलाठी घरोघरी भेटी देतील.
 
तर सहा तारखेला शासकीय जमिनींवर अतिक्रमण किंवा शर्तभंग आढळल्यास त्या जमिनी शासनाकडे परत घेतल्या जाणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी कृत्रिम वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा आणि शिबिरांचे आयोजन होईल. १७ जुलै २०२५ च्या शासन निर्णयानुसार मानक कार्यप्रणाली अवलंबली जाईल. महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित होऊन उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली जाईल.