म्हसळ्यात नातवाने केली आजोबांची हत्या

By Raigad Times    01-Aug-2025
Total Views |
 mhasala
 
म्हसळा | म्हसळा तालुक्यात आणखी एका वृध्दाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (३१ जुलै) रोजी समोर आली आहे. ही हत्या नातवानेच केल्याची माहिती समोर आल्याने म्हसळ्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी म्हसळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
म्हसळा शहरातील फोंडा मोहल्ला येथे राहणारे शौकत हुसेनमियां परदेशी (वय ७५) हे घरी होते. सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या गळ्यावर व हातावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. अज्ञात इसम त्यांच्या घरात घुसला आणि त्याने आजोबांवर वार केले, कोणी ओळखू नये म्हणून हल्लेखोराने त्याच्या तोंडाला कपडा बांधला होता.
 
हल्ल्यानंतर तो भर वस्तीतून पसार झाला, अशी माहिती २० वर्षीय नातवाने पोलिसांना दिली होती. मात्र तपासात त्यानेच आजोबांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी दिली. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास म्हसळा पोलीस करत आहेत.