मैत्री करुन महिलेचा ज्येष्ठ नागरिकाला ७४ लाखांचा गंडा , ऑनलाईन डेटिंग अ‍ॅप वापरणे महागात

By Raigad Times    08-Jul-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | डेटींग अ‍ॅपद्वारे एका अनोळखी महिलेशी मैत्री करणे नवीन पनवेल भागातील एका ६२ वर्षीय नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. या ज्येष्ठ नागरिकाने ज्या महिलेशी मैत्री केली, त्या महिलेने या ज्येष्ठाशी प्रेमाचे नाटक करून त्याच्याकडून तब्बल ७३ लाख ७२ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खांदेश्वर पोलिसांत तक्रार केली आहे.
 
फसवणूक झालेली ही व्यक्ती नवीन पनवेलमध्ये कुटुंबासह राहत आहे. मार्च २०२४ मध्ये त्यांनी मोबाईलमध्ये बम्बल नावाच्या डेटिंग अ‍ॅपवर सर्चिंग सुरू केले होते. त्यावेळी झिया नावाच्या महिलेशी त्यांची ओळख झाली होती. झियाने व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगद्वारे तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करून त्यांच्याशी मैत्री केली. प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी जवळीक साधून विश्वास संपादन केला. त्यानंतर झियाने या ज्येष्ठ नागरिकाला गोल्ड ट्रेडींगमधून भरपूर नफा मिळेल, असे आमिष दाखवले तरुणीच्या सांगण्यावरुन या ज्येष्ठ नागरिकाने २५ हजार रुपयाची ट्रेडींग केली.
 
यावर ३ हजार ५६० रुपये नफा झाला. नफा होत असल्याचे पाहून ज्येष्ठाने यात मोठी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. होणार्‍या फायद्यातून भागीदारीत सौंदर्यप्रसाधन निर्मिती कंपनी स्थापन करण्याची इच्छा व्यक्ती केली. त्यामुळे या ज्येष्ठाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये तब्बल ५८ लाख रुपये गुंतवले. त्यामुळे त्यांना २ कोटींचा नफा झाल्याचे भासवण्यात आले. ही रक्कम त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ४४ लाख ४० हजार रुपये कर भरण्यास सांगण्यात आले.
 
त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी झियाने त्यांच्यावतीने ८ लाख रुपये कर ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये भरल्याचे अ‍ॅपवर दाखवले. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने आणखी १४ लाख २० हजार रुपये भरले. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने नफ्यातील १ कोटीच्या रक्कमेची मागणी केली असता, झियाने ट्रेडींग फ्लॅटफॉर्मची साइट बदलल्याचे तसेच त्याचे नियम बदलल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना २ कोटीच्या नफ्यासाठी त्यांना २२ लाख २० हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली.