कोर्लई येथील संशयित पाकिस्तानी बोटीच्या चर्चेला पूर्णविराम , ...ती बोट नव्हे, तो तर बोया!

रायगडकरांसह सुरक्षा यंत्रणांचा सुटकेचा निःश्वास

By Raigad Times    08-Jul-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | रेवदंड्याजवळील कोर्लई समुद्रात संशयित पाकिस्तानी बोट गायब झाल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. रविवारी रात्रीपासून पोलीस, सागरी सुरक्षा दलासह सर्वच यंत्रणांची अक्षरशः झोप उडाली होती. तपासाअंती ती बोट नव्हे तर मासेमारी जाळीचा बोया असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय तटरक्षक दलाने याबाबत माहिती दिली आणि नागरिकांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
 
रविवारी (६ जुलै) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास, भारतीय सुरक्षा दल दिल्ली यांच्याकडून, कोर्लई किल्ला येथे सुमारे अडीच ते तीन नॉटीकल मैल समुद्रात ‘मुक्कदर बोया ९९’ नावाची एक संशयीत पाकिस्तानी बोट रडारवर दिसत असल्याची माहिती मुरुड सुरक्षा दलाला मिळाली. अतिसंवेदनशील अशी ही माहिती रायगड पोलिसांना मिळताच पोलीसदेखील ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले.पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तातडीने जलद प्रतिसाद पथक व बी.डी.डी. एस. अशी दोन पथके करुन रेवदंडा, साळाव परिसरात पेट्रोलिंग व सर्च ऑपरेशन करण्याचे निर्देश दिले.
 
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, सागरी भागात १९ ठिकाणी सशस्त्र नाकाबंदी करण्यात आली. संशयित वाहने आणि व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली. हॉटेल, लॉजेस, रिसॉर्ट्सचीदेखील तपासणी करण्यात आली. सागरी व खाडी किनार्‍यांवरील लँडींग पॉइंट आणि समुद्र किनार्‍यावर संशयित हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले. सागरी रक्षक दल, स्थानिक मच्छिमार आणि नागरिक यांच्यासोबतही समन्वय साधून बोट आणि व्यक्तींची चौकशी करण्यात आली. समुद्र किनार्‍यावरील सर्व प्रमुख ठिकाणी, जेट्टी, बेट, चेकपोस्टवरही कडक तपासणी केली गेली.
 
alibag
 
भारतीय तटरक्षक दल, कस्टम, मत्स्यव्यवसाय विभागासोबत समन्वय साधून त्यांच्या नौकांचा वापर करुन संशयित क्षेत्रात समुद्रात सर्च ऑपरेशन राबविले गेले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कस्टम, मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांशी समन्वय साधून संशयित बोट शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मत्स्यव्यवसाय विभागासोबत संयुक्त तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.
 
यामध्ये किनार्‍यावर लागलेल्या नौका, जेट्टीवरील व सागरी खाडीकिनारी भागामध्ये नांगरुन ठेवलेल्या नौकांची तपासणी करण्यात आली. सर्व सागरी चौक्या, दुरक्षेत्र, चेकपोस्टवर नाकाबंदी सक्रीय करण्यात आली. किनारी मत्स्यव्यवसाय विभाग व बिनतारी विभाग, यांच्याकडे असलेल्या ड्रोनद्वारे शोध घेतला व सागरी भागात गस्त वाढविण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांना सदर घटनेबाबत दक्षता घेऊन कसून तपासणी करणेबाबत कळविण्यात आले. तसेच शेजारील जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
 
भारतीय तदरक्षक दल, नौदल, सीमाशुल्क विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, सागर रक्षक दल या सर्व विभागांशी संपर्क साधून विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. तसेच भारतीय तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरद्वारे सागरी किनार्‍यांची टेहळणी केली. एकंदरीत या मोहिमेत रायगड जिल्हा पोलीस दलातील ५२ अधिकारी व ५५४ पोलीस अंमलदार या शोध मोहिमेत सहभागी झाले.
 
दिल्लीच्या एक मेसेजनंतर रायगड पोलिसांसह सर्वच यंत्रणांनी दिवसभर या संशयित बोटीचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान केले. शेवटी अशा प्रकारची संशयित बोट आलीच नव्हती तर तो एक बोया असल्याचे स्पष्ट झाले आहे. मासे पकडण्यासाठी वापरण्यात आलेली जाळी बुडू नये म्हणून हा बोया लावला जातो. भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार ती संशयीत वस्तू म्हणजे मासमोरी जाळीचा बोया असून ‘वर्ग ब’ची एआयएस ट्रान्सपाँडरसह भारतीय पाण्यात वाहून आल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वीदेखील ३ जानेवारी २०२५ रोजी अशा प्रकारचा बोया ओखा गुजरात येथे आढळून आला होता.