श्रीवर्धन | शेतकरी असल्याची पडताळणी करुन तशी सातबार्यावर नोंद करण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी करणार्या श्रीवर्धन येथील महसूल सहाय्यकाविरोधात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
विकास मनोहर बोंडले असे या सरकारी कर्मचार्याचे नाव आहे. तक्रारदार हे शेतकरी असल्याबाबत पडताळणी करुन तशी त्याच्या सातबार्यावर नाव नोंद करायची होती. हे प्रकरण श्रीवर्धन तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायक विकास बोंडले याच्याकडे आले असता, त्याने या कामासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारीची सत्यता तपासल्यानंतर विकास बोंडले याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे या प्रकरणाचा तपास नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके करीत आहेत. पोलीस हवालदार पवार, गिरासे, नाईक, गायकवाड़ यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास अँटी करप्शन ब्युरो, ठाणे कार्यालय दुरध्वनी-०२२ २५४२ ७९७९/ टोल फ्री क्र. १०६४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.