नेरळजवळ दुचाकीला अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By Raigad Times    05-Jul-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कर्जत कल्याण राज्यमार्गावर आयशर टेम्पो आणि मोटारसायकलमध्ये भीषण अपघातात घडला. यावेळी मोटारसायकलवरून प्रवास करणारे दांपत्य गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला तर पत्नीवर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे.
 
नेरळजवळील बेकरे आसलपाडा गावातील एकनाथ बबन शेंडे (वय ५२) आणि जयश्री एकनाथ शेंडे (वय ४५) हे दांपत्य मोटारसायकलवरून बाजार खरेदीसाठी नेरळच्या दिशेने येत होते. राज्यमार्गावरील टोकरे आंबिवली परिसरात शुक्रवारी (४ जुलै) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मागून भरधाव येणार्‍या आयशर टेम्पोच्या चाकाखाली येऊन हा अपघात घडला. त्यानंतर टेम्पोचालक वाहन सोडून फरार झाला आहे.
 
मोटरसायकल थेट टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली जाऊन अडकली. अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकलवरील दांपत्य रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. पतीच्या डोक्याला तर महिलेच्या नाकातून व डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. यावेळी नागरिकांच्या भितीनेच टेम्पोचालक आपले वाहन सोडून घटनास्थळाहून फरार झाला. नेरळ पोलीस फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत.