मुंबई मराठी माणसांची, महाराष्ट्राचीच!

By Raigad Times    05-Jul-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग| उमाजी म. केळुसकर | आज, ५ जुलै रोजी, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी अध्याय लिहिला जात आहे. तब्बल एकोणीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत बंधू एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे सकाळी १० वाजता एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. ‘विजय मेळावा’ हे या ऐतिहासिक एकत्र येण्याचे निमित्त आहे.
 
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकविण्याबाबतचे दोन्ही जीआर (शासकीय निर्णय) मागे घेतल्याने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक भाषिक लढाईतील विजय नसून, मराठी अस्मितेच्या आणि मुंबईवरील महाराष्ट्राच्या हक्काच्या संघर्षातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो यापुढील वाटचालीची दिशा ठरवणारा ठरू शकतो. मुंबई महाराष्ट्रात आहे, हे काही केवळ भौगोलिक अपघाताने घडलेलं नाही.
 
यामागे एक प्रदीर्घ संघर्ष आहे, तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा. महाराष्ट्राच्या निर्मितीची ती केवळ एक मागणी नव्हती, तर मराठी अस्मितेचा आणि भाषिक एकजुटीचा तो हुंकार होता. जर तो प्रचंड जनरेट्या नसता, तर आज मुंबई एकतर गुजरातच्या घशात गेली असती किंवा थेट केंद्राच्या ताब्यात. आज मुंबईला ‘कॉस्मोपॉलिटन’ म्हणून मिरवले जात असताना, ती कुण्या एका एका भाषिकांची नाही, असे उच्चरवाने सांगितले जात असले तरी, या मुंबईसाठी १०५ मराठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, हे विसरता येणार नाही.
 
हे रक्त सांडूनच मराठी माणसाने मुंबईसाठी काय मोजले आहे, हे स्पष्ट होते. आजही मराठी माणूस मुंबईत दुय्यम ठरवला जात असल्याचं चित्र समोर येत आहे. विकासाच्या नावाखाली किंवा ‘राष्ट्रीय एकात्मते’च्या गोंडस नावाखाली मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदी भाषेचा जीआर मागे घेतल्याबद्दल आज साजरा होत असलेला हा विजय मेळावा एक समाधानाची बाब असली तरी, ही लढाई इथेच संपलेली नाही. हिंदी भाषेचा जीआर मागे घेणे हे एक तात्पुरते यश आहे. खरी लढाई तर मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क आणि महाराष्ट्राची अविभाज्य ओळख कायम ठेवण्याची आहे.
 
केंद्र आणि गुजरातच्या डोळ्यात मुंबई खुपते आहे, हे स्पष्ट आहे. मुंबईचे आर्थिक महत्त्व, तिची भौगोलिक स्थिती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील तिचे योगदान यामुळे अनेक जण तिच्यावर डोळा ठेवून आहेत. पण, मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहील, हा निर्धार मराठी माणसाने कधीही ढळू देऊ नये. आज मुंबईत मराठी माणूस उपरा ठरवला जात आहे. मराठी भाषिक लोकसंख्येचे प्रमाण घटत असून, इतर भाषिक लोकसंख्या वाढत आहे. याचा परिणाम मराठी संस्कृती आणि भाषेवर होत आहे.
 
आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की, मुंबई केवळ एक शहर नाही, तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. ही केवळ एक औद्योगिक आणि आर्थिक राजधानी नाही, तर मराठी संस्कृतीची आणि परंपरेची ती राजधानी आहे. जर मुंबई महाराष्ट्रापासून दुरावली, तर ते केवळ भौगोलिक विभाजन नसेल, तर ते मराठी माणसाच्या आत्मविश्वासाला आणि भविष्यालाही तडा देणारे असेल.
 
यासाठी आता एकजूट दाखवण्याची गरज आहे. केवळ शासकीय निर्णयांवर अवलंबून न राहता, मराठी माणसाने आपल्या भाषेतून, आपल्या संस्कृतीतून आणि आपल्या एकजुटीतून मुंबईत आपला ठसा उमटवणे गरजेचे आहे. मराठी भाषेचा वापर वाढवणे, मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे आणि मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणे हे आवश्यक आहे.
 
येणार्‍या काळात केंद्र आणि इतर राज्यांकडून मुंबईवर आपला हक्क सांगण्याचे प्रयत्न वाढतील, यात शंका नाही. अशा वेळी, १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाला स्मरून, मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहील, हा संदेश ठामपणे द्यावा लागेल. आजचा हा विजय मेळावा फक्त एक सुरुवात आहे. यापुढे आपल्याला अधिक जागरूक राहून, अधिक संघटित होऊन, मुंबई ही आपलीच आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहेल, हे सिद्ध करावे लागेल.