अलिबाग-वडखळ मार्गावर अवजड वाहतूक बंद , शनिवार, रविवारी वाहतूक कोंडी टाळण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा प्रयत्न

By Raigad Times    05-Jul-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ या मार्गावर दर शनिवार व रविवार जड- अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
 
या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या खासगी वाहनांद्वारे येत असल्याने दर आठवड्याच्या शेवटी येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे रुग्णवाहिकांना अडथळा, तसेच अपघाताची शक्यता वाढते. पोलीस अधीक्षक रायगड यांनी सुचविलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
जड-अवजड वाहने (ट्रक, कंटेनर, डंपर इ.) इत्यादी वाहनांना बंदी असेल. तर दूध, डिझेल, पेट्रोल, एलपीजी गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, महिला सशक्तीकरण मोहिमेसाठी नेमलेली वाहने यांना या कालावधीत मुभा असणार आहे.
 
वाहतूक बंदीचे वेळापत्रक,
शनिवार: सकाळी ८ ते दुपारी २, रविवार: दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत असे राहील.