बांधकाम पूर्ण...प्रतीक्षा कसली? प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे कार्यान्वित करा

आ.प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळ अधिवेशनात मागणी

By Raigad Times    05-Jul-2025
Total Views |
panvel
 
पनवेल | राज्यातील बांधकाम पूर्ण झालेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे कार्यान्वित करण्याची मागणी आ. प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाकडे केली. त्या अनुषंगाने लवकरच सर्व आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याचे ओशासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लेखी स्वरूपात दिले. राज्यात सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीत ४१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून सद्यःस्थितीत त्यातील २१३ केंद्र अद्याप सुरू झाली नसल्याचे मे २०२५ मध्ये निदर्शनास आले आहे.
 
सदर आरोग्य केंद्रांना आवश्यक असलेले फर्निचर, वीज जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे, काही ठिकाणी उद्घाटन कोण करणार असे प्रश्न निर्माण होणे तसेच आरोग्य कर्मचारी नेमण्यासाठी निधी देण्यात येत नसणे इ. कारणास्तव सदर आरोग्य केंद्र अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 
त्यामुळे या प्रकरणी शासनाने चौकशी करुन त्याअनुषंगाने सदर प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना मूलभूत सुविधांसाठी तत्काळ निधी वितरित करुन सदर विनावापर असलेली आरोग्य केंद्रे तातडीने कार्यान्वित करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आ. प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही केंद्रे तातडीने सुरु करून गावागावात दर्जे दार आरोग्य सेवा पोहोचवावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या प्रश्नाच्या माध्यमातून नमूद केले.
 
panvel
 
या प्रश्नावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीत ४१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून सद्यः स्थितीत काही केंद्र अद्याप सुरू झाली नसल्याची बाब अंशतः खरी आहे. सद्यःस्थितीत बांधकाम पूर्ण करण्यात आलेल्या २१३ उपकेंद्रांपैकी २०६ आरोग्य केंद्र कार्यान्वित झालेली असून उर्वरित आरोग्य उपकेंद्र सुरु करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे.
 
२०६ आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवा सुरु करण्यात आली असुन उर्वरित ०७ आरोग्य उपकेंद्रातील फर्निचर व वीज जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असुन लवकरच सदरहू आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करण्यात येतील. तसेच सदरील आरोग्य उपकेंद्रांत आरोग्य विषयक मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता पुरवणी मागणीचा प्रस्ताव विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे.