अलिबागमध्ये ऑफिस पार्टीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार , सहकारी कर्मचार्‍याला अटक

By Raigad Times    04-Jul-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | मुंबईतील कंपनीतील ऑफिस पार्टीसाठी अलिबागमध्ये आलेल्या एका महिला कर्मचार्‍यावर बलात्कार करणार्‍या सहकारी कर्मचार्‍याला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक सावडेकर (वय २५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे त्याचे नाव आहे. ही घटना ३० जून रोजी घडली.
 
संबंधित कंपनीतील चौदा कर्मचारी अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील अलास्का व्हिला येथे पार्टीसाठी आले होते. सायंकाळी मद्यपान सुरु असताना पीडित महिला आपल्या कार्यालयीन कामानिमित्त आधी थांबली होती. काम पूर्ण केल्यानंतर रात्री साडेआठ वाजता तीही पार्टीत सहभागी झाली व मद्यपान केले. मद्याच्या नशेत ती व्हिलामधील जलतरण तलावाजवळ झोपली होती. तिच्या काही सहकार्‍यांनी तिला उचलून बेडरूममध्ये झोपवले.
 
त्यानंतर पहाटे १ जुलै रोजी तीनच्या सुमारास तिला कोणीतरी जबरदस्ती करत असल्याची जाणीव झाली. जाग येताच तिने पाहिले असता अभिषेक सावडेकर हा तिच्या रूममधून बाहेर पडताना दिसला. यासंदर्भात पीडित महिलेने अभिषेककडे चौकशी केली असता त्याने रुम बंद करुन घेतली. सकाळी अकरा वाजता पुन्हा विचारणा केली असता, त्याने घाबरून माफी मागितली. याप्रकरणी पीडित महिला कर्मचार्‍याने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, अभिषेकवर बलात्काराचा गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे. अधिक तपास अलिबाग पोलीस करत आहेत.