सुधागड | पाली येथे माकडांचा उपद्रव , संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष

By Raigad Times    04-Jul-2025
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | सुधागड तालुयातील पाली नगरपंचायत हद्दीत माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पालीकर अक्षरशः माकडांकडून हैराण झाले असून त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय निर्माण झाला आहे. माकडे गॅलरीमधील कुंड्यांमध्ये हात घालून झाडांची नासधूस करतात. खिडयांमधून घरात प्रवेश करून अन्नधान्य उद्ध्वस्त करतात.
 
टेरेसवर ठेवलेले कपडे ओढून फेकतात, फाडतात. रस्त्यावरून चालणार्‍या वाहनांवर उड्या मारतात. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात वन विभागाकडे अनेक वेळा निवेदनं व तक्रारी दाखल करण्यात आल्या असूनही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. नागरिकांचा प्रश्न कायम असून याचा प्रशासकीय दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवतो. माकडांचा उपद्रव केवळ त्रासदायकच नव्हे, तर आकस्मिक अपघात, शारीरिक दुखापत आणि आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरत आहे.
 
त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीची उपाययोजना करणे आवश्यक आहे. माकड नियंत्रणाची जबाबदारी नेमकी कोणाची? वन विभाग, की नगरपंचायत? या प्रश्नाचे उत्तर नागरिकांना हवे आहे, ओशासने नव्हे. त्यामुळे पाली नगरपंचायत आणि वन विभाग यांनी संयुक्तरीत्या उपाय योजना आखून नागरिकांना माकड उपद्रवापासून मुक्त करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.