मुंबई | शासनाने १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही अंतिम मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी पाटीसाठी वेळ घेणे आवश्यक आहे. ही वेळ १५ ऑगस्टपूर्वी घेतल्यास संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई होणार नाही. यानंतर देखील एचएसआरपी पाटी बसवलेली नसलेली वाहने वायुवेग पथकांच्या तपासणीदरम्यान आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी मुदतीच्या आत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.