महाड | पावसाळ्यातील नैसर्गिक धबधबे व पर्यटन स्थळी होणार्या दुर्घटना लक्षात घेऊन महाड तहसिलदार व महाड तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार महाड तालुक्यातील मांडले, केंबुर्ली, वाकी बुद्रुक येथील नानेमाची, भावे, शेवते/आड्राई, रानवडी सातसडा येथील नैसर्गिक धबधबे तसेच महाड तालुक्यातील कोथुर्डे, वरंध, खैरे, कुर्ले, खिंडवाडी येथील आणि सव येथे गरम पाण्याचे कुंड या ठिकाणी ३ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत जाण्यास बंदी केली आहे.
पावसाळ्यामध्ये धबधबे, धरणे या ठिकाणी पर्यटक जावून मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दर्यांचे कठडे, धरणे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणार्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसामुळे वेगाने वाहणार्या धोकादायक पाण्यांत, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्याच्या वरील बाजूला जाणे, अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणार्या पाण्याच्या झोताखाली बसणे, धोकादायक स्थिती व जिवीत हानी होईल असे धबधबे किंवा तलाव ठिकाणी पाण्यांत उतरणे, सदर टिकाणी कचरा, खाद्यपदार्थ, काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, अशाप्रकारचे कृत्य होत असतात.
तरी सदर ठिकाणी शासकीय व खाजगी मालमत्तेची हानी होऊ नये, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येवू नये, पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी तसेच कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत रहावी म्हणून धरण, तलाव, धबधब्याच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये याकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(३) च्या तरतुदीनुसार पर्यटकांवर मज्जाव करणे गरजेचे असल्याने सदर तरतुदीनुसार महाडचे प्रांताधिकारी ओमासे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(३) नुसार गजबजलेल्या पर्यटनस्थळाचे ठिकाणी व त्याच्या १ कि.मी.च्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (३) नुसार खालील नमुद बाबींसाठी ३ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.