धाटाव औद्योगिक वसाहतीतील रस्त्याला उकिरड्याचे स्वरुप

By Raigad Times    31-Jul-2025
Total Views |
 roha 1
 
धाटाव | रोहा तालुयातील धाटाव औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कंपन्या, हॉटेल, अनधिकृतपणे उभारलेल्या टपर्‍यांतून कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणाहून रहदारी करणारे नागरिक, पादचारी व कामगार वर्गाचे आरोग्य धोयात आले आहे. रस्त्यावरून जाणार्‍यांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 
यामुळे कामगार, प्रवासी उद्योजक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांना उकिरड्याचे रूप आले की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत. या वसाहतीतील रस्त्यालगत असणारे नाले अक्षरश: माती, झुडपे, गवत आणि गाळाने भरले असल्याने याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या पाण्याची दुर्गंधीही प्रचंड त्रासदायक ठरत आहे.
 
त्यातच रस्त्याच्या दुतर्फा बाजूला पडलेला प्लास्टिकच्या पिशव्यातील कचरा या ठिकाणी कुत्रे इतरस्त्र पसरवित असतात. पावसामुळे हाच कचरा भिजल्याने कुजलेल्या अवस्थेत असल्याने याची प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. दरवर्षी रस्त्याच्या नालेसफाईसाठी आणि इतर कामांसाठी होणारा खर्च जातो कुठे? याचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या संबंधित अधिकारी वर्गाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सर्वसामान्य नागरिक आणि कामगार वर्गातून बोलले जात आहे.