खालापूर येथील मुख्य रस्त्याची दैना , खड्ड्यातून प्रवास करणे बनले धोकादायक; प्रवासी हैराण

By Raigad Times    31-Jul-2025
Total Views |
 KHOPOLI
 
खोपोली | खालापूर तालुयातील बहुतांशी ग्रामीण गावांना जोडणार्‍या रस्त्याची अवस्था ही अत्यंत बिकट झाल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकांसह प्रवासीवर्गाला करावा लागत आहे. खालापूर तालुयातील मिरकुटवाडी फाटा मार्गे गोळेवाडी, खानाव, भोकरपाडा, नारंगी, गोरठण अशा अनेक गाव आणि वाड्याना जोडणार्‍या मुख्य रस्त्यांची चाळण झाल्याने जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतराच्या मार्गावरून प्रवास करणे सर्वाना जिकरीचे बनले आहे.
 
हा मार्ग वर्दळीचा असून रात्रं-दिवस परिसरातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, स्कूल बस व अन्य वाहनांची वाहतूक सुरू असल्याने खड्डेमय मार्गावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील सदय परिस्थितीत रस्ता खड्ड्यात की, खड्ड्यात रस्ता हेच कळेना झाल्याने सर्व प्रवासी व वाहनचालक हैराण झाले असून या खड्डेमय रस्त्याचे संबंधित प्रशासनाने गांभीर्य घेत या रस्त्याची दुरूस्ती करुत लवकरात लवकर मार्ग खड्डेमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
 
मिरकुटवाडी फाटा मार्गे गोळेवाडी, खानाव, भोकरपाडा, नारंगी, गोरठण अशा अनेक गाव आणि वाड्याना जोडणार्‍या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या मार्गावरुन अनेक शाळकरी विद्यार्थी व नागरिक, चाकरमानी दररोज प्रवास करीत असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ पाहायला मिळत असल्यामुळे या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन मोटारसायकली रस्त्यावरून घसरून वाहनचालकांना दुखापत होत आह. चारचाकी वाहन चालकांना खड्ड्यांतून पुढील मार्ग शोधणे कठीण बनले असल्याने सर्वजण खड्डेमय रस्त्याबाबत तीव्र संताप करत आहेत.