अलिबाग | जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील पूल व स्लॅब कलवर्ट संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्या पुलांवरुन अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.
विजना कन्सल्टींग इंजिनिअर्स प्रा.लि. या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर- भादाणे व भाकरवड-देहेन या मार्गांवरील एकूण ८ पुलांची भार क्षमता अत्यल्प (५ ते १६ टन) असल्याचे स्पष्ट झाले. वाहतूक बंद असलेले पूल रामराज पूल, सुडकोली पूल, सहाण पूल, नवेदर बेली पूल, देहेन पूल या पुलांवरुन अवजड वाहतूक बंद केली आहे.
यासाठी अलिबाग-पेझारी नाका-कुर्डूस -वेलशेत-आंबेघर-भिसे खिंड मार्गे रोहा हा मार्ग, अलिबाग -उसर-वावे मार्गे रेवदंडा, पांडवादेवी-पोयनाड-पेझारी श्रीगाव मार्गे देहेन असा पर्याय देण्यात आला आहे. पावसाळ्यामुळे पूल अधिक असुरक्षित झाल्याने वाहनचालकांनी व ट्रान्सपोर्ट संस्थांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करतानाच अपघात टाळण्यासाठी व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर आदेश पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असून, नियमभंग करणार्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला आहे.