रेडीमेड मूर्तींमुळे चिरनेरचे कलानगर संकटात

शाडूच्या गणेशमूर्ती घडविणार्‍या पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर परिणाम

By Raigad Times    31-Jul-2025
Total Views |
 uran
 
उरण | उरण परिसरात बाहेरुन रंगकाम करुन तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असल्याने, येथील पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. शाडू मातीच्या मूर्ती घडविणार्‍या चिरनेर कलानगरीतील पिढीजात मूर्तिकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडावत चालले आहेत. त्यामुळे हे मूर्तिकार अडचणीत आले आहेत. गणपती सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे.
 
पिढ्यानपिढ्या शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे काम उरण परिसरातील अनेक ठिकाणी सुरु आहे. यापैकी चिरनेरचे कलानगर शाडूच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. या कलानगरीतील सुमारे ३० कारखान्यांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची लगबग सुरु आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार महिने आधीच येथील मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात.
 
मात्र चिरनेर कलानगरी परिसरातच नव्हे तर संपूर्ण उरण तालुक्यात बाहेरुन तयार गणेशमूर्ती (रेडिमेड) विक्रीसाठी येत असल्याने येथील पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. पिढीजात कुंभार समाजाच्या मूर्तिकारांच्या ग्राहकांची संख्या वर्षागणिक रोडावत चालली आहे. त्यामुळे येथील मूर्तिकारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. उरण शहर व खेड्यापाड्यात गणेशमूर्तींच्या विक्रीची अनेक दुकाने थाटली आहेत.
 
तसेच अगदी शाडूच्या मूर्तीपेक्षा निम्म्याहून अधिक कमी दरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रींच्या रेडीमेड मूर्ती पेण येथून आणून त्यांना रंगकाम करुन त्या ग्राहकांना विकल्या जातात. त्यामुळे चिरनेर येथील कलानगरीतील कारखान्यातून शाडूच्या मूर्ती घडविण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. यामुळे नव्या ग्राहकांबरोबर जुने ग्राहकही मोठ्या प्रमाणावर कमी झाले असल्याची खंत येथील शाडूच्या मूर्ती घडविणार्‍या व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मागील पाच पिढ्यांपासून आजपर्यंत फक्त गणेशमूर्ती कारखान्यात शाडू मातीच्याच घडविल्या जातात. त्यामुळे शाडू मातीच्या गणेशमूर्ती पसंत करणारे नवे जुने ग्राहक आमच्या कारखान्यात येऊन दोन महिने आधीच गणेश मूर्ती बुकिंग करतात. ग्राहकांच्या पसंतीच्या फोटो व मागणीनुसार गणेशमूर्ती आम्ही साकारतो; पण बाहेरून येणार्‍या गणेशमूर्तींमुळे शाडूच्या गणेशमूर्तींच्या मागणीत मोठी घट झाली आहे. - भाई चौलकर, सुनील चौलकर मूर्तिकार, चिरनेर
दरवर्षी रंग, शाडूच्या मातीचे वाढते भाव, वाढती मजुरी आणि महागाईचा फटका पांरपारिक मूर्ती व्यवसायावर होत आहे. त्यामुळे पिढीजात व्यवसाय आता केवळ मूर्तिकला जोपासण्यापुरताच उरला आहे. यात खूपच चढउतार आहेत; पण या चढउताराची पर्वा न करता कला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. - गजानन चौलकर, नंदकुमार चिरनेरकर मूर्तिकार, चिरनेर