कर्जत | मुंबई नालासोपारा येथून आलेल्या युवकाचा कर्जत येथील साई लीला रिसॉर्टवर शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कवीन पारकर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो आपल्या अन्य मित्रांसह फिरण्यासाठी आला होता. रविवारी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबईतील नालासोपारा, लोअरपरेल, घाटकोपर अशा विविध ठिकाणी राहणारे सात कॉलेज युवक-युवतींचा ग्रुप कर्जतमध्ये आला होता.
तालुक्यातील कडाव टाटा पॉवर कॅम्प भिवपुरी परिसरातील साई लीला या रिसॉर्टवर हे तरुण मुक्कामाला आले होते. त्यांच्या ग्रुपमध्ये दोन मुली होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टवर पोहचल्यानंतर सर्व आवरून हे सर्वजण साडेसहाच्या सुमारास रिसॉर्टच्या परिसरात मजा करीत होते.
यातील नालासोपारा येथील कवीन पारकर या युवकाला रिसॉर्टवर असलेल्या लोखंडी पाळण्याच्या ठिकाणी हात लावल्याने विजेचा झटका बसला. विजेचा झटका एवढा जबरदस्त होता की कवीन जागेवरच बेशुद्ध पडला. त्यामुळे घाबरून गेलेल्या मित्रांनी कर्जत भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल येथे आपल्या मित्राला दाखल केले होते; परंतु येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. मृतदेहावर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले.