अलिबाग | अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्याजवळ बोट पलटी झाल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीनही मच्छिमारांचे मृतदेह सोमवारी (२८ जुलै) वेगवेगळ्या किनार्यांवर आढळून आले आहेत. उरण तालुक्यातील करंजा येथील तुळजाई नावाची बोट शनिवारी (२६ जुलै) अलिबाग खांदेरी किल्ल्याजवळ मासेमारीसाठी आली होती.
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक महाकाय अशी साठ फूट उंच लाट आली आणि ही बोट पलटी झाली होती. बोटीमध्ये ८ खलाशी होते. यापैकी हेमंत बळीराम गावंड (रा.आवरे), संदीप तुकाराम कोळी (रा.करंजा), रोशन भगवान कोळी (रा. करंजा), शंकर हिरा भोईर (रा. आपटा, पनवेल) कृष्णा राम भोईर (रा. आपटा, पनवेल) या पाच खलाशांनी लाटांचा मारा सोसत, पोहत सासवणे किनारा गाठला.
मात्र त्यांच्यासोबतचे नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा) मुकेश यशवंत पाटील हे तीन मच्छिमार बेपत्ता झाले होते. दोन दिवसानंतर सोमवारी (२८ जुलै) या तिघांचे मृतदेह सासवणे, किहीम आणि दिघोडे किनारी आढळून आले आहेत. या घटनेमुळे मच्छिमारांमध्ये शोककळा पसरली आहे.