अलिबाग | शेकापचा ७८ वा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून मनसेप्रमुख राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी दिली. गेल्या वर्षभरात शेकापमध्ये बरीच पडझड झाली आहे. या पार्श्वभूमीवर होणार्या या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
चित्रलेखा पाटील यांनी सोमवारी (२८ जुलै) शेकाप भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मेळाव्याच्या रुपरेषेची माहिती दिली. शनिवार, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नवीन पनवेल येथे हो मेळावा होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट हा आमचा प्रमुख शत्रू असणार आहे, असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला.
दरम्यान, हा मेळावा भव्यदिव्य होण्यासाठी शेकापकडून जिल्हाभरात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा मेळावा कार्यकर्त्यांच्या मनोबलात नवा जोश निर्माण करणारा ठरेल, असा विश्वासही त्यांची व्यक्त केला.