अलिबाग | कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणार्या कृषीमंत्री कोकाटे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, यासाठी सोमवारी, २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कोकाटे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांनतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. राज्याचे कृषीमंत्री शेतकर्यांप्रती अर्वाच्य भाषा वापरतात. त्यांना जुगार खेळण्याचा नाद आहे.
असे बेजबाबदार मंत्री शेतकर्याला जुगाराच्या डावाला लावतील, अशी भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.कृषी मंत्री कोकाटे यांच्या वागण्याने राज्याची बदनामी होत आहे. सर्वात वादग्रस्त आणि बेफिकीर मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपटटी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. जर ही मागणी मान्य झाली नाही तर मुंबई गोवा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी पक्षाचे जिल्हासचिव श्रीहर्ष कांबळे, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष अजहर धनसे, महाड तालुकाध्यक्ष संदीप सपकाळ, माणगाव तालुकाध्यक्ष राजू रेडेकर, खालापूर तालुकाध्यक्ष हरेश पाटील, अलिबाग अध्यक्ष प्रवीण रनवरे, रोहयाचे तुषार खडीवाले, झुल्फीकार टोळ, अश्विनी महाडीक, पराग वडके, मुकुंद म्हात्रे, बिपीन म्हात्रे उपस्थित होते.