अलिबाग | अलिबाग तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशार शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.
अलिबाग-रोहा मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कुरुळ ते आरसीएफ कॉलनी, वेलवली खानाव ते उसर वावे नाका अशा अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रेवदंडा ते तळेखार रस्ता रुंदीकरणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळामार्फत १७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. परंतू आजच्या परिस्थितीत या रस्त्याला चिखलाचे स्वरुप आले आहे. अलिबाग - मांडवा रस्त्यासाठी १८८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. पॉवर फ्रंट या कंपनीला ठेका दिला आहे. परंतु या रस्त्यावरुन प्रवास करताना प्रचंड त्रास होत आहे. अलिबाग-मुरुड रस्त्यासाठी १३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तारमेट कंपनीला काम देण्यात आले आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. खड्डे चुकविताना वाहने घसरुन पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. त्यामुळे तातडीने हे खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.