उरण | मासेमारी करण्यास शासनाची बंदी आहे. ही बंदी उठण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. असे असताना उरण येथील दोन बोटी एकाच दिवशी बुडाल्याची घटना शनिवारी घडली. एक बोट अलिबाग खांदेरी किल्ल्याजवळ तर दुसरी उरण तालुक्यातील मोरा बंदराजवळ पलटी झाली. दोन्ही बोटीत मिळून १४ खलाशी होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून तिघे बेपत्ता आहेत. दहा खलाशी पोहत किनार्यावर पोहचण्यात यशस्वी झाले.
अलिबाग | करंजा येथील मनोहर गणपतल कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची बोटशनिवारी (दि.२६) सकाळी सात वाजता करंजायेथून निघाली. बोटीमध्ये ८ खलाशी होते. ही बोट सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारात अलिबाग येथील खांदेरी किल्ल्याजवळपोहचली. मासेमारी करीत असताना, एक ६० फुट उंच अशी महाकाय लाट आली आणि एका क्षणात बोट पलटी झाली, अशी माहिती बोटीवरील खलाशांनी दिली आहे.
बोट पलटल्यामुळे बोटीतील हेमंत बळीराम गावंड (रा.आवरे), संदीप तुकाराम कोळी, (रा. करंजा), रोशन भगवान कोळी (रा. करंजा), शंकर हिरा भोईर (रा. आपटा, पनवेल) कृष्णा राम भोईर (रा.आपटा, पनवेल) या पाच खलाशांनी लाटांचा मारा सोसत, पोहत सासवणे किनारा गाठला. मात्र त्यांच्यासोबतचे नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा) मुकेश यशवंत पाटील हे तिघे अजूनही बेपत्ता आहेत.
यापैकी रोशन कोळी या तरुणाच्या डोक्याला मार बसला असून इतर किरकोळ जखमी आहेत. त्यांना अलिबागच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. शासनाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत समुद्रातील मासेमारीवर बंदी घातली आहे. परंतु बंदी कालावधीत मासेमारी सुरू असते. त्यामुळे मासेमारी करणार्या बोटी समुद्रात बुडण्याच्या घटना घडतात. मागील वर्षी आवरे गावातील एक खलाशी बेपत्ता झाला होता.
लाल बावटा लावून धोक्याचा इशारा दिला असताना उरण करंजा येथील मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट अलिबाग येथील समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती उरण येथील परवाना अधिकारी सुरेश बाबूलगावे तसेच उरणचे तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांनी दिली आहे. उरण तालुक्यातील वशेणी, केळवणे, दादर या खाडीकिनारी राजरोसपणे बंदी कालावधीत मासेमारी रात्री अपरात्री सातत्याने होत असल्याने वशेणी गावच्या सरपंच अनामिका हितेंद्र म्हात्रे यांनी उरणच्या तहसीलदारांना लेखी स्वरूपात कळवले आहे. त्या पत्राची दखल घेतली असती तर सदरची दुर्घटना टळली असती असे सरपंच अनामिका म्हात्रे यांनी म्हटले आहे.
उरण | मोरा येथे बोट बुडाली
उरण | उरण येथील एक बोट शनिवारी (२६ जुलै) सकाळी अलिबाग येथे बुडालेली असतानाच, त्याच रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक छोटी बोटी उरण येथील मोरा बंदराजवळ बुडाल्याची घटना घडली. या बोटीवरील एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मोरा बंदाराजवळ खोल समुद्रात नांगरुन ठेवलेल्या मच्छिमार बोटीतील सहा खलाशी एका छोट्या बोटीने मोरा बंदरात येत होते. बंदरापासून काही अंतरावर असतानाच त्यांची बोट पलटी झाली. बोटीतील पाच खलाशांनी सुखरुप किनारा गाठला; मात्र एकाचा मृत्यू झाल्याचे कळते. एकाच दिवशी झालेल्या या आघातने मच्छिमारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, समुद्रात नांगरुन ठेवलेली बोट मासेमारी करुन परतली होती. या बोटीत असलेले पापलेट मासे एका छोट्या बोटीतून आणले जात असताना हा अपघात झाल्याची चर्चा परिसरात सुरु होती.