सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

By Raigad Times    28-Jul-2025
Total Views |
 roha
 
धाटाव | राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षदी सुधाकर घारे यांची निवड करण्यात आली असून, हनुमंत जगताप यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक रविवारी (२७ जुलै) सुतारवाडी गीताबाग येथे पार पडली.
 
यावेळी ही निवड जाहीर करत, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, मुश्ताक अंतुले, दत्ताजी मसुरकर, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, दाजी विचारे, स्नेहल जगताप, विजयराव मोरे, उमा मुंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या आहेत. स्थानिक पातळीवर महायुती समन्वय समितीच्या युती आघाडीबाबत बैठका सुरु आहेत.
 
यामध्ये महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या तळागाळातील कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, असा शब्द यावेळी तटकरे यांनी दिला. दिल्लीत गेल्यावर मला करमत नाही; कारण मला सतत कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहण्याची सवय झाली आहे. माझे कार्यकर्ते हेच माझे टॉनिक आहे. त्यांच्या सततच्या सहवासामुळे मला रोज नवीन ऊर्जा मिळते, असे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे म्हणाले.
 
रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी दिलेला पदाचा राजीनामा मंजूर करत त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे खा.तटकरे यांनी जाहीर केले. यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेत सुधाकर घारे यांची जिल्हाध्यक्षपदी तर हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.