सुधागडात सशस्त्र दरोड्यांची मालिका; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By Raigad Times    28-Jul-2025
Total Views |
 pali
 
पाली/वाघोशी | सुधागड तालुक्यातील गोंदाव, हातोंड आणि माठळ या तीन गावांमध्ये रविवारी (२७ जुलै) पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोड्यांची मालिका घडली. अज्ञात टोळीने धारदार शस्त्रांच्या धाकाने गावकर्‍यांच्या घरांमध्ये घुसून सोने, रोकड, बँकेशी संबंधित कागदपत्रे लंपास केली.
 
या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, रायगड पोलीस तपासाच्या कामाला लागले आहेत. ही घटना रविवारी पहाटे १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. गावागावांमध्ये एका पाठोपाठ एक दरोडे टाकले. गोंदाव गावात पहिला दरोडा टाकण्यात आला. त्यानंतर हातोंड गावात, चव्हाण व वाघमारे कुटुंबियांच्या घरात घुसून दरोडेखोरांनी त्यांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू लुटल्या. माठळ गावात शेवटचा दरोडा टाकण्यात आला.
 
एका पीडितेने सांगितले, ‘रात्री झोपेत असताना अचानक आवाज आला. कोयता घेऊन काही लोक घरात घुसले. त्यांनी आम्हाला गप्प बसण्याची धमकी दिली आणि घरातील सर्व काही घेतले.गावातील अनेक वृद्ध, महिला आणि लहान मुले या घटनेनंतर भयभीत अवस्थेत आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मानसिक धक्का मोठा आहे. जांभूळपाडा पोलिस स्टेशनचे अधिकारी मध्यरात्री हजर झाले आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले असून, या ठिकाणी पाली पोलीस निरक्षक हेमलता शेरेकर रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल या सहरायगडतील पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे व विविध दिशांनी तपास सुरू आहे.
 
पोलीस निरीक्षकांनी सांगितले, ‘सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची साक्ष आणि तांत्रिक पुरावे गोळा करत आहोत. लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल.’ तपासासाठी श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या टोळीचा याआधीही तालुक्यात वावर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रात्रीची गस्त वाढवा; गावकर्‍यांची मागणी
गावकर्‍यांनी रात्रीची गस्त वाढवण्याची आणि सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची मागणी केली आहे. माठळ गावातील रहिवाशी म्हणाले, "जर नियमित गस्त असती, तर ही घटना घडलीच नसती. गावात पोलिसांची उपस्थिती हवी.” सुधागड तालुक्यातील काही ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "सुधागड हा शांततेचा भाग आहे. अशा घटना लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. पोलिसांनी वेळ वाया न घालवता कार्यवाही करावी, अशी मागणी हातोंडचे उपसरपंच नितीन वाघमारे यांनी केली आहे.