स्मार्टमीटर सक्तीविरोधात मनसे आक्रमक , महाड महावितरण कार्यालयावर दिली धडक

By Raigad Times    28-Jul-2025
Total Views |
 mahad
 
महाड | महाड शहरासह ग्रामीण भागात स्मार्टमीटरच्या सक्तीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर चढू लागला आहे. या वाढत्या तक्रारींचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (शुक्रवार) दि. २५ जुलै रोजी आक्रमक पवित्रा घेतला. शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकातील महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकार्‍यांना जाब विचारला आणि लेखी निवेदन सादर करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्टमीटर सक्तीने बसवले जात आहेत. त्यातून विजबिलात अनैसर्गिक वाढ होत असून अनेक तांत्रिक त्रुटींमुळे नागरिक हैराण झाले असल्याचे या निवेदनातून सांगण्यात आले आहे. ज्याप्रमाणे विजबिल भरण्यासाठी महावितरणकडून सतत मेसेज अथवा लाऊडस्पीकरद्वारे सूचना दिल्या जातात. त्याप्रमाणे स्मार्टमीटर बसवण्यापूर्वी तशीच तत्परता का दाखवली जात नाही? असा थेट सवाल उमासरे यांनी यानिमित्ताने अधिकार्‍यांसमोर उपस्थित केला.
 
या स्मार्टमीटरमुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याने यापुढे कोणत्याही कर्मचार्‍याने सक्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास ग्राहकांनी त्यांना तात्काळ हाकलून द्यावे असे आवाहनही त्यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने केले आहे. लवकरच वरिष्ठांच्या कानावर हा विषय घालून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रमुख राज ठाकरे यांना या विषयाची सविस्तर माहिती देण्यात येणार असून शासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही उमासरे यांनी दिला आहे.