फिनोझॉल कंपनीतून ज्वलनशील रसायनाचे प्रदूषण , ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना निवेदन

By Raigad Times    28-Jul-2025
Total Views |
KHOPOLI
 
खोपोली | साजगाव गावातील युनिव्हर्सल इस्टेटमध्ये रसायनांचे उत्पादन करणारी फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स कंपनी आहे. या कारखान्यात ज्वलनशील रसायनाच्या प्रदूषणामुळे ताकई गावातील नागरिकांना अनेक दिवसांपासून त्रास होत आहे. २५ जुलै रोजी रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रदुषणामुळे त्रास झाल्यामुळे ताकई गावातील तरुणांनी कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता सदर तक्रारीची दखल घेण्याचे एशासन कंपनीने दिले.
 
यासंबंधीचे निवेदन खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना देण्यात आले असून, प्रदुषण मंडळाकडे तक्रार करणार असल्याचेही माजी नगराध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी सांगितले. साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक रासायनिक कंपन्यांमधील प्रदूषित सांडपाणी मोकळ्या जागेत सोडले जाते. तेच पाणी जमिनीत मुरते, त्यामुळे बोरवेलचे पाणीही प्रदूषित झाले आहे.
 
साजगाव गावच्या बाजूलाच खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई गाव आहे. फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स कंपनीमधील धुराची चिमणी ताकई गावाकडे आहे, तिची उंची कमी असल्यामुळे रसायनांच्या उग्र वासामुळे गुदमरल्यासारखे होते. डोळ्यांना जळजळ होत आहे, उलट्या होतात. नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना आणि गावातील नागरिकांना त्रास होत आहे. कंपनी परिसरात वृक्षलागवड नाही, अनधिकृत बांधकाम केले आहे, याविरोधात पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक ग्रामस्थ मनिष खवळे तब्बल बारा वर्षापासून कारवाईसाठी पत्रव्यवहार करीत आहेत.
 
परंतु संबंधित विभागाकडून त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपन्यांना अभय दिले जात असल्याने लोकशाही दिनाच्या सुनावणीत मनिष खवळे यांनी तक्रार मांडत स्थळ पाहणी करीत पाण्याचे नमुने तपासा अशी तक्रार केली होती. त्यानंतर तहसिलदार अभय चव्हाण यांनी प्रदुषण मंडळ, आरोग्य विभाग आणि महसुल विभागाची टिम पाठवली होती, अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही.
 
२६ जुलै रोजी रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रदुषणामुळे त्रास झाल्यामुळे ताकई गावातील तरूणांनी कंपनीच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.सुनिल पाटील, संदेश पाटील, चंद्रशेखर पाटील, संजय पाटील, राकेश पाटील, मंदार पाटील, युगल पाटील, हितेन पाटील, यांच्यासह गावातील तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारी यंत्रणेला लेखी पत्रव्यवहार करूनही लक्ष दिले जात नाही. काल झालेल्या प्रदुषणाच्या घटनेनंतर ग्रामस्थांवर दबाव टाकून कागदपत्रे पूर्ण असल्याचे कंपनी व्यवस्थापक सांगतात. प्रदुषणाच्या धुराचे लोट गावाकडे जाताय याविरोधात अशी कोणती सरकारी यंत्रणा आहे ती कारवाई करू शकते असा सवाल आहे. -मनिष खवळे, पर्यावरणप्रेमी, तसेच स्थानिक ग्रामस्थ
फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स कंपनीतील प्रदुषणामुळे अनेक दिवसांपासून त्रास होत आहे. परंतु काल संध्याकाळी उग्रवासामुळे गुदमरल्यासारखे झाले, डोळ्यांना जळजळ झाली. काहींना उलट्या झाल्याची घटना घडली आहे. नगरपालिकेची प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना प्रचंड त्रास झाला आहे. -संदेश पाटील, स्थानिक ग्रामस्थ, ताकई
कंपनीतील प्रदुषणामुळे अनेक दिवसांपासून त्रास होत आहे. परंतु काल संध्याकाळी उग्रवासामुळे त्रास झाला आहे. यासंबंधीची तक्रार खोपोली पोलिस ठाण्यात केली आहे, प्रदुषण मंडळाकडे तक्रार करणार आहोत. -डॉ. सुनिल पाटील माजी नगराध्यक्ष