अलिबाग | अलिबागचे सुपूत्र, यशस्वी उद्योजक आणि निष्ठावान समाजसेवक गजेंद्र दळी यांचे रविवारी (२७ जुलै) वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने अलिबागच्या सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ‘ब्रह्मा विष्णू महेश सिनेप्लेक्स’चे संस्थापक म्हणून ते परिचित होते, तर त्यांचे सामाजिक कार्यही मोठे होते.
गजेंद्र दळी यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा जवळील घाटरोळ गावचे. त्यानंतर त्यांचे वडील तुकाराम दळी पानाचे दुकान चालविण्यासाठी मुंबईत स्थायिक झाले. पुढे हे कुटुंब अलिबागमध्ये आले, जिथे त्यांनी पानाचे आणि विडी बनविण्याचे दुकान सुरू केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर गजूभाऊंना व्यवसायात अधिक रुची निर्माण झाली. यातूनच, १९७० साली अलिबागमध्ये महेश चित्रमंदिरची स्थापना झाली.
सुरुवातीला हे एक ओपन थिएटर होते, जे नंतर कायमस्वरुपी थिएटरमध्ये रुपांतरित झाले आणि आज ते ‘ब्रह्मा विष्णू महेश सिनेप्लेक्स’ म्हणून अलिबागकरांच्या मनोरंजनाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. गजूभाऊंनी आपल्या आयुष्यात ४२ देशांचा प्रवास केला होता. केवळ उद्योजकच नव्हे, तर एक संवेदनशील समाजसेवक म्हणूनही त्यांची ओळख होती. ते ज्येष्ठ नागरिक संघटनेत सक्रिय होते आणि लायन्स क्लबचे सदस्य होते.
लायन्स हेल्थ फाऊंडेशनला त्यांनी कॅट्रॅक्ट ऑपरेशनसाठी अद्ययावत यंत्रणेसाठी १० लाख रुपयांची मदत केली होती. तसेच, १०४ आदिवासी जोडप्यांचे सामुदायिक विवाह लावून त्यांनी अनेकांच्या जीवनात आनंद आणला होता. उत्तम जीवनशैलीचे पुरस्कर्ते असलेले गजूभाऊ निर्व्यसनी होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी सुधा, दोन पुत्र सत्यजीत, विश्वजीत आणि सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गजूभाऊंच्या निधनाने अलिबागने एक दूरदृष्टीचा उद्योजक आणि समर्पित समाजसेवक गमावला आहे.