पनवेल । पनवेल आणि अलिबाग या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला फुटीचे ग्रहण लागले. पक्ष नेतृत्वाच्या घरातले सदस्य भाजपा मध्ये गेले त्याचबरोबर पनवेलला ही मोठा फटका बसला. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पनवेल या ठिकाणी ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. २ ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथील पोलीस मैदानावर पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शेतकरी कामगार पक्ष आणि रायगड हे समीकरण जवळपास ५० वर्ष कायम राहिले होते. महाराष्ट्राच्या विधिमंडळात एकेकाळी विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शेकापची पूर्ण महाराष्ट्रात राजकीय ताकद होती दरम्यान रायगडात स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभेत पक्षाला मतदारांनी साथ दिली. २००९ नंतर शेकापला उतरती शेतकरी कामगा कळा लागली.
पनवेल चा गड ५० वर्षा नंतर ढासळला, त्यानंतर पेण अलिबाग मध्ये सुद्धा पराभवाला सामोरे जावे लागले. उरण मध्ये सुद्धा पक्षाला तीन निवडणुकांमध्ये यश मिळाले नाही. दरम्यानच्या काळामध्ये अलिबाग मधील पाटील कुटुंबीयांमध्ये फूट पडली. माजी आमदार पंडित शेठ पाटील, आणि माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपचे कमळ हातामध्ये घेतले.
त्यानंतर पनवेल मध्ये ही माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा फटका बसला. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करणाच्या या पक्षाने यंदा पनवेल मध्ये मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. नवीन पनवेल येथे पोलीस मैदानावर हा वर्धापन दिन आयोजित केला आहे. पनवेल महानगरपालिका निवडणूक त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद रणधुमाळी च्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जात आहे.
डॅमेज कंट्रोल चे आव्हान! पनवेल आणि अलिबाग मध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली आहे. याशिवाय पक्षाचे खटारा चिन्ह सुद्धा गेले आहे. माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका तोंडावर आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. विशेष करून पनवेल मध्ये निवडणुकीला सामोरे जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व दृष्टिकोनातून शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील आणि माजी विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
रणनीती आणि भूमिका स्पष्ट होणार !
पक्षाला लागलेली गळती, त्याचबरोबर येऊ घातलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल येथे होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष आपली रणनीती आणि भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याचा हा उद्देश आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की आघाडी बरोबर या दृष्टिकोनातूनही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.