महाड | महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलीस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ८८.९२ कोटी किंमतीचा किटामाईन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. बंद असलेल्या या कारखान्यातबेकायदेशीररित्या रसायन प्रक्रिया सुरु होती.
त्यामुळे महाड औद्योगिक वसाहतीमधील बंद असलेले कारखाने आता पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन, महाड एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या प्रांगणात सुरु असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली.
या ठिकाणाहून ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला. या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून, सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आजमितीला अनेक कारखाने बंद अवस्थेत असून त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने छुप्या पद्धतीने अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज एका बंद कंपनीत सुरु असलेल्या बेकायदेशीर व्यवसायानंतर या साखळीत अनेक बंद कंपन्यांचे धागेदोरे अडकले असण्याची शक्यता आहे. पोलीस तपासात अशा बेकायदेशीर व्यवसाय करणार्या सर्व कंपन्यांचा पर्दाफाश होणार आहे.