पनवेल | रॅपीडो अॅपवरुन प्रवासी भाडे घेण्यासाठी गेलेल्या एका कॅबचालकाला चौघा लुटारुंनी बेदम मारहाण करुन त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि खात्यातून फोन पेद्वारे जबरीने पैसे ट्रान्सफर केल्याची धक्कादायक घटना कळंबोली येथे घडली. कळंबोली पोलिसांनी या चौघा लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील तक्रारदार कॅबचालकाचे नाव अब्दुल कादीर इस्माईल केळकर (वय ३१) असे असून तो मुंब्रा कौसा परिसरात राहण्यास आहे. सव्वापाच वाजण्याच्या सुमारास तो रॅपीडो अॅपवरून आलेले भाडे घेण्यासाठी कळंबोली सेक्टर-१७, रोडपाली येथील बालाजी इंटरनॅशनल स्कूलजवळ गेला होता. त्यावेळी मुंबई कुलाबा मार्केट येथे जाण्याच्या बहाण्याने दोघे लुटारू अब्दुलकडे विचारणा करून त्याच्या कारमध्ये बसले.
त्यानंतर त्यांचे इतर दोन साथीदारदेखील कारमध्ये बसले. या चौघांनी कॅबचालक अब्दुलला मारहाण करुन त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांनी अब्दुलला धमकावून त्याच्याकडून मोबाईलचा पासवर्ड आणि फोन पे अॅपचा पासवर्ड मागितला. मात्र अब्दुलने त्यांना पासवर्ड देण्यास नकार दिल्याने चौघा लुटारुंनी दमदाटी केली.
त्यानंतर जबरदस्तीने फोन पेचा पासवर्ड घेऊन त्याद्वारे त्याच्या मोबाईलवरुन पाच हजार रूपये आपल्या खात्यात वळते करून घेतले आणि ते पळून गेले. या घटनेनंतर कॅबचालकाने कळंबोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चौकडीविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.